नाशिक : नव्या शहर विकास आराखड्याबरोबरच नव्याने तयार करण्यात आलेल्या विकास नियंत्रण नियमावलीमुळे प्रचलित बांधकाम नकाशे कसे मंजूर करायचे हा प्रश्न मार्गी लागला आहे. नवीन विकास नियंत्रण नियमावली अंतिमत: मंजूर होत नाही तोपर्यंत सध्याच्या नियमावलीनुसारच बांधकामे मंजूर करण्याचा निर्णय आयुक्तडॉ. प्रवीण गेडाम यांनी घेतला आहे.आगामी वीस वर्षे कालावधीत शहराचे नियोजन कसे असावे यासाठी नगररचना खात्याने तयार केलेला शहर विकास आराखड्याचे प्रारूप नुकतेच खुले झाले आहे. नागरिकांनी त्यावर हरकती आणि सूचना सादर केल्यानंतर सुनावणी घेतली जाईल त्यानंतर शासन योग्य तो बदल करून किंवा बदलाशिवाय हा आराखडा मंजूर करेल. तथापि, त्यामुळे नव्याने बांधकाम परवानगी देताना अनेक निर्बंध येतात. आराखड्यात ज्या भूखंडावर आरक्षणे प्रस्तावित आहेत, तेथे मिळकतधारकाने बांधकामासाठी परवानगी मागितली तर ती देता येत नाही. त्यामुळे १२० नव्या भूखंडावर परवानगी देणे बंद करण्यात आले आहे. दुसरीकडे या आराखड्यासमवेत नवीन नियंत्रण नियमावली आल्याने त्याविषयीदेखील गोंधळाचे वातावरण आहे. नगररचना अधिनियमात केवळ आराखड्यासंबंधात पालिका हिताचा निर्णय घेण्यासंबंधी तरतूद आहे. त्यामुळे सामासिक अंतर, टीडीआर आणि अन्य तत्सम बाबींबाबत काय निर्णय घ्यावा याबाबत संभ्रम निर्माण झाला होता.
नियमावलीनुसारच बांधकामे मंजूर करण्याचा निर्णय
By admin | Published: May 30, 2015 1:32 AM