मनमाड : नांदगाव तालुक्यातील नेत्यांनी पक्षीय मतभेद बाजूला ठेवून नार-पार प्रकल्पातील हक्काचे पाणी मिळविण्याकरिता डीपीआरमध्ये नांदगाव तालुक्याच्या समावेशासाठी एकजुटीने आंदोलन उभारण्याचा निर्णय भालूर येथील बैठकीत घेण्यात आला. नांदगाव तालुका सर्वपक्षीय जलहक्क समितीच्या वतीने भालूर येथे तालुक्यातील सरपंच, विविध लोकप्रतिनिधी, कार्यकर्ते व शेतकरी यांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ज्येष्ठ नेते बापूसाहेब कवडे बोलताना म्हणाले की, सर्वांनी पक्षीय मतभेद बाजूला ठेवून हक्काच्या पाण्यासाठी एकत्र येण्याची गरज आहे. माजी आमदार जगन्नाथ धात्रक यांनी या कामासाठी शासकीय प्रशासकीय स्तरावरून नियमित पाठपुरावा करणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त केले. यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष दत्तराज छाजेड, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष संतोष गुप्ता, आम आदमी पार्टीचे तालुकाध्यक्ष विशाल वडघुले, सुभाष नहार, सजनराव कवडे, सुभाष निकम, सरपंच संदीप आहेर आदींनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी सेनेचे तालुकाध्यक्ष किरण देवरे, पंचायत समिती सदस्य श्रावण गोरे, दिगंबर निकम, संदीप शिंदे, देवीदास निकम, सुधाकर पवार, अण्णा काकळीज, रमेश निकम, शिवाजी ढगे, विनायक लहिरे, बबन मेंगळ, रमेश शिंदे आदींसह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष नीलेश चव्हाण यांनी, तर आभार तालुकाध्यक्ष परसराम शिंदे यांनी मानले. सूत्रसंचालन सोमनाथ तळेकर यांनी केले.
नार-पारच्या पाण्यासाठी आंदोलन उभे करण्याचा निर्णय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2018 12:21 AM