नाशिक जिल्ह्यातील कोरोना सद्यस्थिती, उपाययोजना व लसीकरण याबाबत आढावा बैठक पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत शनिवार (दि. १७) घेण्यात आली. त्यात उपरोक्त निर्णय घेण्यात आला. यावेळी भुजबळ यांनी जिल्ह्यात ४०० मेट्रिक टन ऑक्सिजनचा साठ्याचे नियोजन करून त्यात १६० मेट्रिक टन ग्रामीणमध्ये तर २४० टन शहरी भागात ऑक्सिजन उपलब्ध करण्यात येणार असून, जिल्ह्यात ८० मेट्रिक टन ऑक्सिजन जनरेशन प्लँटच्या माध्यमातून उपलब्ध होईल तर २८० मेट्रिक टन लिक्विड ऑक्सिजन उपलब्ध होणार आहे. त्यामुळे ऑक्सिजन जनरेशन प्लँटची कामे लवकरात लवकर पूर्ण करण्यात यावी अशा सूचना दिल्या.
जिल्ह्यातील कोरोनामुक्त असलेल्या ३३५ गावांमध्ये शाळामध्ये ८ वी ते १२ पर्यंत वर्ग सुरू करण्यास परवानगी देण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. जिल्ह्यातील ४२ हजार विद्यार्थ्यांच्या पालकांनी मुलांना शाळेत पाठविण्याबाबत संमतीपत्र दिले आहे त्यामुळे सोमवारपासून शाळा सुरू करण्यात येणार आहेत. चार वाजताच्या आतच शाळा सुरू राहणार असून, शाळेमध्ये विद्यार्थ्यांसाठी मोफत मास्क उपलब्ध करून देण्यात यावे, अशा सूचना भुजबळ यांनी शिक्षण विभागाला केल्या तसेच गेल्या १ महिन्यात एकही रुग्ण आढळला नाही अशा ठिकाणी शाळा सुरू करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. मात्र शहरात शाळा सुरू होत नसल्याने शहरात शाळा सुरू करण्याबाबत शासनाकडे पाठपुरावा केला जाईल व शासनाने ठरवून दिलेल्या नियमावलीनुसारच शाळा सुरू करण्यात याव्यात अशा सूचनाही त्यांनी दिल्या. पावसाळ्याचे दिवस असल्याने पर्यटनस्थळांवर पर्यटकांची होणाऱ्या गर्दीमुळे कोरोना वाढण्याची भीती व्यक्त करून जिल्ह्यातील सर्व पर्यटनस्थळांवर बंदी घालण्यात आली असून, पर्यटनस्थळांवर जमावबंदीचे आदेश जारी करण्याचे तसेच राजकीय, सामाजिक सर्व कार्यक्रमांवर बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
या बैठकीस जिल्हाधिकारी सूरज मांढरे, मनपा आयुक्त कैलास जाधव, पोलीस आयुक्त दीपक पांडेय, ग्रामीण पोलीस अधीक्षक सचिन पाटील, मुख्याधिकारी लीना बनसोड, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अशोक थोरात, निवासी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रशांत खैरे, डॉ. अनंत पवार, मनपा आरोग्य अधिकारी बापूसाहेब नागरगोजे, अन्न, औषध प्रशासनाचे सहायक आयुक्त डॉ. दुष्यंत भामरे, डॉ. संजय गांगुर्डे, निवासी उपजिल्हाधिकारी भागवत डोईफोडे, उपजिल्हाधिकारी वासंती माळी आदी उपस्थित होते.
(फोटो १७ भुजबळ)