नाशिक : जिल्ह्यातील पॉझिटिव्हिटी रेट ८.११ टक्के तर ऑक्सिजन बेड ४० टक्क्यांपेक्षा कमी वापरात असल्यामुळे नाशिक जिल्हा हा निर्बंध शिथिल होण्यास पात्र आहे. मात्र, नेमके कोणते निर्बंध शिथिल करायचे व किती प्रमाणात शिथिल करायचे, याबाबत जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची बैठक सोमवारी सायंकाळी घेऊन, त्यानंतरचा सविस्तर निर्णय जिल्हा प्रशासनाच्या वतीने जाहीर करण्यात येणार आहेत.
कोरोना रुग्ण वाढ आणि ऑक्सिजन खाटांच्या उपलब्धतेवर जिल्ह्यांमधील निर्बंध शिथिल करण्याचे निर्देश राज्य सरकारने जिल्हा प्रशासनाला दिले आहेत. मात्र, नाशिक जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी दर यापूर्वीच १० टक्क्यांच्या खाली आल्याने, जिल्हा गत आठवड्यातच रेड झोनमधून बाहेर आला होता. तोच पॉझिटिव्हिटी दर आणि ऑक्सिजन बेड्सची उपलब्धता लक्षात घेऊनच, जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी रविवारी त्याबाबतचे संकेत दिले आहेत. दरम्यान, २०११च्या जणगणनेनुसार १० लाखांपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या सर्व महानगरपालिका जसे की, मनपांमध्ये बृहन्मुंबई, ठाणे, नवी मुंबई, कल्याण-डोंबिवली, वसई-विरार, पुणे, पिंपरी चिंचवड , नागपूर, औरंगाबाद, नाशिक यांना कोरोना संसर्गाला रोखण्यासाठी स्वतंत्र प्रशासकीय घटक म्हणून समजण्यात येणार असल्याचेही जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे नाशिकसह सर्व दहा महापालिकांच्या हद्दीतील निर्णय घेण्याचा अधिकार हा त्या संबंधित महापालिकेलाच राहणार आहे. त्याचप्रमाणे, या पालिकांच्या क्षेत्रांव्यतिरिक्तचा जिल्ह्यातील उर्वरित भाग हा वेगळा प्रशासकीय घटक राहणार असल्याने, तिथे जिल्हा प्रशासनाचा निर्णय लागू राहणार आहे.
इन्फो
सकाळी ११ ऐवजी दुपारी २ पर्यंत वाढीव वेळ
सर्व आवश्यक वस्तू व सेवांची दुकाने जी सध्या सकाळी ७ ते ११ या वेळेत सुरू आहेत, ती सकाळी ७ ते दुपारी २ या वेळेत सुरू ठेवता येऊ शकणार आहेत. त्याचप्रमाणे, सर्व आवश्यक गटात नसलेल्या इतर दुकानांना उघडणे आणि त्यांच्या वेळा याबाबतीत स्थानिक आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण निर्णय घेईल, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे. मात्र, आवश्यक गटातील दुकानाच्या वेळेप्रमाणेच त्यांच्या वेळा असतील, तसेच शनिवार, रविवारी ती बंद राहतील, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे. दुपारी ३ नंतर मात्र वैद्यकीय किंवा इतर आणीबाणीच्या प्रसंगांव्यतिरिक्त येण्या-जाण्यावर निर्बंध कायम राहणार आहेत.