नाशिक : जिल्ह्यातील ५६५ ग्रामपंचायतींसाठी शुक्रवारी झालेल्या उमेदवारांचे भवितव्य मतदान यंत्रात बंद झाल्यानंतर सोमवारी (दि.१८) त्यांच्या नशिबाचा फैसला होणार आहे.ज्या तालुक्यांमध्ये निवडणूक झाली अशा १३ तालुक्यांमध्ये सकाळी १० वाजेपातून मतमोजणी होणार आहे. मतमोजणीसाठी सर्व प्रशासकीय तयारी पूर्ण करण्यात आली असून दुपारपर्यंत बहुतेक ग्रामपंचायतींचे निकाल हाती येणार आहेत.नाशिक जिल्ह्यातील ६२१ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा कार्यक्रम निवडणूक आयोगाने जाहीर केला होता. त्यापैकी ५५ ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या असून उर्वरित ५६५ ग्रामपंचायतीसाठी गेल्या शुक्रवारी मतदान प्रक्रिया पार पडली. त्यामध्ये ११ हजार ५६ उमेदवारांचे भवितव्य मतदान यंत्रात बंद झाले. ५६५ ग्रामपंचायतींच्या ४२२९ जागांसाठी जिल्ह्यातील ८ लाख ८० हजार ६२ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. त्यामुळे मतदानाची टक्केवारी ८०.३६ इतकी झाली. जिल्ह्यात सर्वत्र मतदारांचा प्रचंड उत्साह असल्याने निकालाची उत्कंठा वाढली आहे. ग्रामपंचायत निवडणूक झालेल्या तालुक्यांमध्ये १०,९५,९७३ इतक्या मतदारांची नोंद झाली होती. त्यापैकी ८,८०,०६२ इतक्या मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. यामध्ये ४,०९,४१२ महिला, तर ४,७०,६४९ पुरुष मतदारांचा समावेश आहे.प्रशासनाकडून मतमोजणीची सर्व तयारी करण्यात आली आहे. ज्या तालुक्यांमध्ये मतदान झाले अशा ठिकाणी तहसील कार्यालय येथे मतमोजणी होणार आहे. सकाळी १० वाजेपासून मतमोजणीला प्रारंभ होणार आहे. ग्रामपंचायतींच्या जागांनुसार जिल्ह्यात एकूण १४२ टेबलांवर ही मतमोजणी होणार असून ७४० कर्मचारी मतमोजणीसाठी नियुक्त करण्यात आलेले आहे. सिन्नरमध्ये सर्वाधिक १५७ कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. या ठिकाणी ९० ग्रामपंचायतींसाठी १७०० उमेदवार नशीब अजमावत आहेत. ज्या ठिकाणी अधिक उमेदवार आहेत, अशा ठिकाणी अतिरिक्त टेबल लावण्यात आलेले आहेत. मतमोजणी केंद्रांना मंजुरी दिल्यानंतर अशा सर्व ठिकाणी मतमोजणीसाठी रविवारी संपूर्ण तयारी करण्यात आली. सर्वत्र तहसीलदार या संपूर्ण प्रक्रियेवर लक्ष ठेवून आहेत.२०० मीटरपर्यंतच्या परिसरात पोलीस बंदोबस्तमतमोजणी केंदांवर सर्वत्र पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला असून मतमोजणी केंद्र परिसरात गर्दी होणार नाही याबाबतची काळजी घेतली जात आहे. केवळ उमेदवार आणि त्यांच्या मतमोजणी प्रतिनिधीस परवानगी देण्यात आलेली आहे. मतमोजणी केंद्रांबाहेर गर्दी होणार नाही यासाठी केंद्रापासून २०० मीटरपर्यंतच्या परिसरात पोलीस बंदोबस्तदेखील वाढविण्यात आलेला आहे.
गावकारभाऱ्यांचा आज फैसला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2021 1:39 AM
जिल्ह्यातील ५६५ ग्रामपंचायतींसाठी शुक्रवारी झालेल्या उमेदवारांचे भवितव्य मतदान यंत्रात बंद झाल्यानंतर सोमवारी (दि.१८) त्यांच्या नशिबाचा फैसला होणार आहे.
ठळक मुद्देग्रामपंचायत निवडणूक : तालुकापातळीवर होणार मतमोजणी