नाशिक : महापालिकेच्या स्थायी समितीत एक सदस्य नियुक्तकरण्यासंदर्भात विभागीय आयुक्तच निर्णय घेणार असून, यासंदर्भातील उच्च न्यायालयाचे आदेश महापालिकेला प्राप्त झाले आहेत.स्थायी समितीत भाजपाची एक जागा कमी होऊन सेनेची एक जागा वाढत आहे, असा शिवसेनेचा दावा आहे. यासंदर्भात शिवसेनेने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यात विभागीय आयुक्तांनी अहवाल सादर करावा, असे आदेश उच्च न्यायालयाने दिले होते. त्यानुसार विभागीय आयुक्तांनी १२ मार्च रोजी भाजपा-शिवसेनेचे गटनेते, महापौर आणि नगरसचिवांना हजर राहण्याचे आदेश दिले होते. परंतु तत्पूर्वीच म्हणजे ११ मार्च रोजी उच्च न्यायालयाने यासंदर्भातील निर्णय विभागीय आयुक्तांनी घ्यावा, असे आदेश देत शिवसेनेची याचिका निकाली काढली.सुनावणीच्या दरम्यान या विषयावर चर्चा झाल्यानंतर विभागीय आयुक्तांनी यासंदर्भातील निकालाची सर्टिफाइड कॉपी मागितली होती. दरम्यान, निकालाची ही प्रत त्यांना शिवसेनेने पोहचती केली आहे, परंतु त्याचबरोबर महापालिकेला त्याची एक प्रत मिळाली आहे. त्यामुळे आता विभागीय आयुक्त हेच निर्णय घेणार असून, पुढील आठवड्यात यासंदर्भातील कार्यवाही होण्याची शक्यता आहे.
स्थायीच्या वादाबाबत विभागीय आयुक्तच घेणार निर्णय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2019 12:09 AM