नाशिक : इकोसेन्सेटिव्ह झोनबाबत वन विभाग आणि जिल्हाधिकारी कार्यालयाकडून यंदा गांभीर्याने कामकाज झाले असल्याचे दिसते. या दोन्ही विभागांनी सातत्याने यासाठी पाठपुरावा केल्यामुळे येत्या दीड-दोन महिन्यातच ‘इको सेन्सेटिव्ह झोन’संदर्भातील निर्णय होऊ शकतो, असा विश्वास जलतज्ज्ञ राजेंद्र सिंह यांनी व्यक्त केला. निसर्ग आणि नदीच्या संवर्धनाची संकल्पना निश्चित करणेदेखील अपेक्षित असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयात जलतज्ञ्ज राजेंद्र सिंह यांनी ब्रह्मगिरी इको सेन्सेटिव्ह झोनबाबत आढावा घेतला. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी भागवत डोईफोडे, उपजिल्हाधिकारी नितीन मुंडावरे, ब्रह्मगिरी बचाव कृती समितीचे कार्यकर्ते उपस्थित होते.
याप्रसंगी सिंह यांनी ब्रह्मगिरीसह परिसरातील पर्यावरण रक्षणासंदर्भात महत्त्वपूर्ण असलेल्या इको सेन्सेटिव्ह झोनबाबत माहिती घेतली असता त्यांनी जिल्ह्याच्या कामकाजावर समाधान व्यक्त करीत येत्या दीड-दोन महिन्यांत इको सेन्सेटिव्ह झोनला अंतिम स्वरूप येऊ शकेल असा विश्वास व्यक्त केला. ब्रह्मगिरीसह ५५ पर्वतांच्या संरक्षणासाठी २०१४ मध्ये लागू असलेल्या इको सेन्सेटिव्ह झोनबाबत यावेळी गांभीर्याने काम झाले असल्याने साधारणत: महिनाभरात इको सेन्सेटिव्हचे आदेश येऊ शकतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
मुळात या कामाला उशीर झाला असल्याचे मान्य असले तरी आता येथून पुढे जे काही चांगले होणार आहे ते महत्त्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले. निसर्ग संवर्धन आणि प्रदूषणमुक्त नदी होण्यासाठीचे प्रयत्न होण्यासाठी नियोजनात्मक कामाची आवश्यकता आहे. गोदावरी बारमाही वाहण्यासाठी मुळात ब्रह्मगिरीचे संरक्षण झाले पाहिजे. गोदाकाठी होणाऱ्या दगडी कामाबाबत त्यांनी काहीशी नाराजी व्यक्त केली.
--इन्फो--
रोपवेचा मुद्याही चर्चेत
यावेळी झालेल्या बैठकीत ब्रह्मगिरी कृती समितीच्या वतीने राजेंद्र सिंह यांना नियोजित रोपवेच्या उपक्रमाविषयीची माहिती दिली. यावेळी प्रशासनाने आता केवळ प्रस्ताव असल्याचे सांगितले असता पर्यावरणप्रेमींनी त्यास हरकत घेत अंजनेरी येथे मोठ्या प्रमाणात जैवविविधता असल्याने येथे असा प्रयोग करणे चुकीचे ठरेल असे मुद्दे उपस्थित केले.
--इन्फो--
हरियाली और निर्मलता
ब्रह्मगिरीची हरियाली आणि गोदावरीची निर्मलता राखणे ही सर्वांची जबाबदारी असून, त्यादृष्टीने आपले कामकाज झाले पाहिजे, असे सांगताना सिंह यांनी पर्यटनाच्या नावाखाली निसर्गाचा होणार ऱ्हास थांबविला पाहिजे अशी अपेक्षाही व्यक्त केली. गोदावरी बारमाही वाहण्यासाठी ब्रह्मगिरीचे संरक्षण झाले पाहिजे, असेही ते म्हणाले.