सिन्नर : तालुका औद्योगिक सहकारी वसाहतीत (स्टाइस) उद्योजकांच्या हिताचे निर्णय घेण्यापासून रोखले जात असून, पॅनलचे नेते नामकर्ण आवारे यांच्या हुकूमशाहीला कंटाळून आपण गट सोडत असल्याची घोषणा संस्थेचे अध्यक्ष पंडितराव लोंढे, उपाध्यक्ष मीनाक्षी दळवी, माजी अध्यक्ष अविनाश तांबे, माजी उपाध्यक्ष रामदास दराडे यांनी पत्रकार परिषदेत केली.संस्थेच्या आजी-माजी अध्यक्ष व उपाध्यक्षांनी पत्रकार परिषद घेऊन नामकर्ण आवारे संस्थेत काम करण्यापासून पदाधिकाऱ्यांना कसे अडचणीत आणतात याचा पाढाच वाचून दाखविला. उद्योजकांच्या हिताचे निर्णय घेण्यास बैठकीत सूचना केल्यानंतर ‘तुम्हाला काही कळत नाही’, असे सुनावले जात असल्याने या हुकूमशाहीला आपण कंटाळलो असल्याचे त्यांनी सांगितले. आवारे यांच्या नेतृत्वाखाली होतकरू उद्योजकांनी संस्थेच्या प्रगतीसाठी पॅनलची निर्मिती करून १५ वर्षांची सत्ता उलथवून सत्तांतर घडवून आणले होते.मात्र थोड्याच दिवसात आमचा संस्थेत केवळ ‘शोभेचे बाहुले’ म्हणून उपयोग केला जात असल्याचे निदर्शनास आल्याचे तांबे व दळवी यांनी सांगितले. औद्योगिक वसाहतीला वॉल कंपाउण्ड बांधणे, विहीर खोदणे, जलशुद्धिकरण केंद्राचा मासिक खर्च या सर्व कामात काही गोष्टी लपवून ठेवण्यात आल्याचे त्यांनी सांगून त्यामुळे संस्थेचे आर्थिक नुकसान होत असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले. गेल्या दोन महिन्यांपासून सहा संचालकांनी संस्थेच्या बैठकीवर बहिष्कार टाकला असून, त्यामुळे उद्योजकांची विविध कामे खोळंबली असल्याचे त्यांनी सांगितले. त्यातील तीन संचालकांचे उद्योग व्यवसाय चालू नाही. त्यांना संस्थेशी देणे-घेणे नाही. अशा संचालकांना हाताशी धरून पॅनलचे नेते उद्योजकांच्या हिताचे निर्णय घेण्यापासून आम्हाला रोखत असल्याचा आरोप आजी-माजी पदाधिकाऱ्यांनी केला.संचालकांना एकत्र येऊ दिले जात नाही. चार वर्षात उद्योजकांच्या हिताचे निर्णय घेऊ दिले नाही. फोडाफोडीची कामे केली जातात. चुकीची कामे करण्यास भाग पाडले जाते. उद्योजकांच्या हिताची कामे होत नसल्याने उद्योजक आमच्यावर नाराज होत असल्याचे या पदाधिकाºयांनी सांगितले. त्यामुळे आम्ही चार संचालक नामकर्ण आवारे यांच्या गटातून वेगळे होत असल्याची घोषणा यावेळी करण्यात आली. सभासदांची विशेष सर्वसाधारण सभा घेऊन उद्योजकांची खोळंबलेली कामे मार्गी लावणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.गडाख यांचे स्मारक बांधण्यावरून मतभेद?औद्योगिक वसाहतीचे संस्थापक व माजी आमदार सूर्यभान गडाख यांचे गेल्या नोव्हेंबर महिन्यात निधन झाले. त्यावेळी संस्थेचे अध्यक्ष पंडितराव लोंढे यांनी श्रद्धांजली भाषणात गडाख नानांचे औद्योगिक वसाहतीच्या आवारात स्मारक उभारण्याची घोषणा केली. त्यानंतर सदर विषय मासिक बैठकीत ठेवण्यात आला. त्यावेळी सहा संचालक गैरहजर राहिले. त्यानंतरच्या बैठकांवर बहिष्कार टाकून कामकाज होऊ दिले नसल्याचा आरोप करण्यात आला. केवळ नानांचे स्मारक होऊ नये यासाठी आपल्याकडे अध्यक्षपदाचा राजीनामा मागण्यात येत असल्याचे लोंढे यांनी सांगितले.सत्ताधारी गटात उभी फूटगेल्या सुमारे साडेचार वर्षांपूर्वी सिन्नर तालुका औद्योगिक सहकारी वसाहतीची संचालक मंडळाची निवडणूक झाली होती. त्यात नामकर्ण आवारे यांच्या नेतृत्वाखाली १२ संचालक विजयी झाले होते, तर विरोधात दिलीप शिंदे हे एकमेव उमेदवार विजयी झाले होते. मात्र आता आजी-माजी अध्यक्ष व उपाध्यक्ष या चार जणांनी आपण आवारे यांचा गट सोडत असल्याची घोषणा केली. त्यामुळे सत्ताधारी गटात उभी फूट पडली असल्याचे दिसून येते. संस्थेची संचालक मंडळाची निवडणूक येत्या सहा महिन्यात होण्याची शक्यता आहे.आवारे यांचे ‘नो कॉमेन्ट्स’संस्थेचे अध्यक्ष पंडितराव लोंढे, उपाध्यक्ष मीनाक्षी दळवी, माजी अध्यक्ष अविनाश तांबे, माजी उपाध्यक्ष रामदास दराडे यांनी नामकर्ण आवारे यांच्यावर हुकूमशाही कामकाज व अन्य आरोप केल्यानंतर आवारे यांची प्रतिक्रिया घेण्यासाठी ‘लोकमत’ने त्यांच्यासोबत भ्रमणध्वनीवर संपर्क केल्यानंतर आवारे यांनी ‘नो कॉमेन्ट्स’ म्हणत प्रतिक्रिया देण्यास नकार दिला.