नाशिक : काश्मीर येथील पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या सभागृहात पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणा देत नगरसेवकांनी परिसर दणाणून सोडला. त्यामुळे महासभेचे कामकाज चालविण्याच्या तयारीत असलेल्या सत्ताधारी भाजपाला महासभा तहकूब करावी लागली. दरम्यान, महासभेपूर्वीदेखील पाकिस्तानच्या प्रतीकात्मक ध्वजाची होळी भाजपाच्या काही नगरसेवकांनी केली.
महापालिकेची तहकूब झालेली ही महासभा आता शुक्रवारी (दि. २२) होणार आहे. महापालिकेची मासिक महासभा बुधवारी (दि. २२) सकाळी आयोजित करण्यात आली होती. महापालिकेच्या महासभेने सर्वप्रकारची करवाढ रद्द करण्याचा ठराव करूनही आयुक्त त्याची अंमलबजावणी करीत नसल्याने शिवसेनेसह विरोधी पक्षांनी त्यावर लक्षवेधी सूचना मांडली. त्यावर घणाघाती चर्चा होण्याची शक्यता होती. मात्र ती चर्चा टळली आहे.
महापालिकेची महासभा बुधवारी (दि. २०) महापौर रंजना भानसी यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती. मात्र, तत्पूर्वी मुकेश शहाणे यांच्यासह काही नगरसेवकांनी पाकिस्तानचा निषेध करीत सभागृहाबाहेर पाकिस्तानचा प्रतीकात्मक झेंडा जाळला. त्यानंतर सभागृहात कामकाज सुरू झाल्यानंतर हौतात्म्य पत्करलेल्या जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्याच्या प्रस्तावाचे वाचन करण्यात आले आणि त्यानंतर महापौरांनी नियमित कामकाज सुरू करण्याचा प्रयत्न केला. यावेळी अपक्ष नगरसेवक मुशीर सय्यद यांनी पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणा दिल्या. त्यांना शिवसेनेसह अन्य विरोधी पक्षांनी साथ दिली. भाजपाचे नगरसेवक यात सहभागी झाले होते. विरोधी पक्षनेता अजय बोरस्ते यांनी यावेळी दहशतवादी हल्ल्यात ४४ जवानांचे प्राण गेले. देशपातळीवर शोक व्यक्त केला जात असताना महासभा घेणे संयुक्तीत होणार नाही, असे सांगत सभा तहकुबीची मागणी केली. मुशीर सय्यद यांनीदेखील ही सभा तहकूब करावी, असे सांगितले.
पाकिस्तान मुर्दाबादची घोषणा देत असतानाच सत्तारूढ भाजपाचे नगरसेवकदेखील त्यात सहभागी झाल होते. त्यातील काहींनी सभा तहकुबीची मागणी केली. त्यानुसार कामकाज तहकूब करण्यात आले. महापौरांनी सभागृहात तहकूब सभा २८ फेब्रुवारीस घेण्याची घोषणा केली असली तरी त्यादिवशी सर्वच प्रभाग समित्यांवर अशासकीय सदस्य नियुक्तीसाठी बैठका असल्याने आता ती शुक्रवारी (दि. २२) रोजीच घेण्यात येणार आहे.