पाळे खुर्द : सद्यस्थितीत पाळे खुर्द परिसरातील रब्बी हंगामावर बेमोसमी पावसाचा परिणाम झाल्याने कांदा उत्पादनात मोठी घट झाल्याचे समोर आले आहे. यंदा कांदा पिकाचे उत्पादन एकरी ८० ते ९० क्विंटल झाल्याचे शेतकऱ्यांकडून सांगण्यात येत असून एकरी सरासरी १८० ते १९० क्विंटल होणारे उत्पादन यंदा अर्ध्यावर आल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.मिळालेल्या उत्पादनातून पिकासाठी केलेला खर्च देखील निघणार नसल्याने शेतकऱ्यांचे जीवन उद्ध्वस्त होते की काय अशी भीती व्यक्त होत आहे. कोरोना संसर्गामुळे भाजीपाला पिके करावी की नाही या संभ्रमावस्थेत शेतकरी आहेत. कारण भाजीपाला पिके करण्यासाठी प्रथम रोपवाटिकेमध्ये पिकांची रोपे नोंदवावी लागतात. त्यानंतर रोपे मिळतात. रोपे लागवड करून पिके घेतली जातात. पुढील खर्च हा एकरी लाखात आहे. लाखो रुपये खर्च करून लॉकडाऊन राहिला तर आपला शेतमाल कुठे विकायचा अशी चिंता शेतकऱ्यांना सतावत आहे. पाळे खुर्द परिसरात कांदा पिकानंतर टोमॅटो, हिरवी मिरची, कोबी, फ्लॉवर, वाल पापडी व गवार आदी भाजीपाला पिके मोठ्या प्रमाणात घेतली जातात. परंतु कोरोनाच्या संचारबंदीची डोक्यावर टांगती तलवार असल्याने भाजीपाल्याची लागवड करायची की नाही अशा द्विधा मनस्थितीत शेतकरी सापडले आहेत.यंदा शेतकऱ्यांची भयंकर परिस्थिती होणार आहे. कारण नगदी पीक कांदा उत्पादन घटल्याने शेतकरी अर्थव्यवस्था उद्ध्वस्त होणार आहे.- सचिन पाटील, शेतकरी, पाळे खुर्दपाणी असून शेतीत पिके घ्यावीत की नाही अशी चिंता शेतकरीवर्गाला सतावत आहे. कारण संचारबंदी अशीच चालू राहिली तर शेतमाल विकायचा कुठे?- जयदीप पाटील, शेतकरी, पाळे खुर्द.