शरदचंद्र खैरनार/ एकलहरे : राज्यात विजेची मागणी कमी झाल्याने वीजनिर्मितीत घट झाली आहे. त्यामुळे नाशिकसह कोराडी, खापरखेडा, पारस, चंद्रपूर, भुसावळ येथील औष्णिक वीजनिर्मिती संचातून क्षमतेपेक्षा कमी वीज उत्पादन सुरू आहे, तर परळी येथील वीज उत्पादन शून्यावर आले आहे. उरण येथे गॅसपुरवठ्याअभावी संच बंद आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने हॉस्पिटल्समध्ये ऑक्सिजनची निकड, ऑक्सिजन प्लांटची उभारणी, त्यासाठी अखंडितपणे वीजपुरवठा करणे गरजेचे होते. उन्हाच्या वाढत्या उकाड्याने विजेचा घरगुती व कार्यालयांतील वापर, शेतीच्या खरीप हंगामाच्या कामांची लगबग यामुळे औद्योगिक, कृषी व घरगुती विजेचा वापर वाढल्याने गेल्या पंधरवड्यात विजेची मागणी २४ हजार मेगावॉटपर्यंत गेली होती. मात्र सद्याचे पावसाळी वातावरण, काही प्रमाणात लॉकडाऊनमुळे बंद असलेले उद्योग, घरगुती व शेतीसाठी लागणाऱ्या विजेची मागणी कमी होऊन १६ हजार मेगावॉटपर्यंत येऊन ठेपली आहे. त्याचा परिणाम वीजनिर्मितीवर झाला आहे. दुसरीकडे पाण्याच्या पुरेशा साठ्याने जलविद्युत केंद्रांचा सपोर्ट मिळाल्याने औष्णिकची वीजनिर्मिती कमी करण्यात आल्याचे सांगण्यात येते. काही ठिकाणी झिरो शेड्युल, कोळशाची समस्या, वार्षिक देखभाल दुरुस्ती या कारणांमुळे काही संच बंद ठेवावे लागत आहेत. या सर्वांचा परिणाम म्हणून मंगळवारी दुपारपर्यंत विजेची निर्मिती घटली आहे.
मागणी घटल्याने वीजनिर्मितीत कपात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2021 1:28 AM