मानोरी : माजी सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ यांच्या पाठपुराव्याने येवला तालुक्यातील मानोरी बुद्रुक येथे जनसुविधा योजनेअंतर्गत दहा लाख रुपये निधी मंजूर करून सन २०१३ मध्ये नव्याने ग्रामपंचायत कार्यालयाची उभारणी करण्यात आली आहे. सरकारी कागदपत्रे गोळा करण्यासाठी नागरिकांची धावपळ काहीशी कमी व्हावी यासाठी येथील एकाच ठिकाणी ग्रामपंचायत कार्यालय, तलाठी कार्यालय आणि कृषी सहायक अशा तीन शासकीय कार्यालयांची एकाच जागेवर भव्य उभारणी केली आहे, परंतु ग्रामपंचायत कार्यालय वगळता तलाठी कार्यालय आणि कृषी सहायक कार्यालय इमारत बांधल्यापासून जवळपास पाच वर्षांपासून दोन्ही कार्यालये कुलूप लावलेल्या अवस्थेत आहे. एकदाही या कार्यालयात अधिकारी येत नसल्याने दोन्ही कार्यालये केवळ शोभेच्या वस्तू म्हणून बांधल्याचे दिसून येत आहे. मानोरी बुद्रुकच्या शेतकऱ्यांना तलाठी सजा कार्यालय म्हणून देशमाने येथील कार्यालयात सात बारा, खाते उतारा, ६ ड च्या नोंदी मिळविण्यासाठी देशमाने येथे जावे लागत आहे. मागील दीड वर्षापासून देशमाने तलाठी कार्यालयाचा बोजवारा उडाला असून, तलाठ्याअभावी देशमाने सजा अंतर्गत देशमाने खुर्द, देशमाने बुद्रुक, मानोरी बुद्रुक ही तीन गावे असून, सात बारा, खाते उतारा, ६ ड च्या नोंदी मिळविण्यासाठी त्रास होत असल्याने शेतकरी त्रस्त झाले आहेत. मानोरी बुद्रुक येथे उभारण्यात आलेल्या तलाठी कार्यालयात आठवड्यातून किमान दोन ते तीन दिवस तरी तलाठी यावा, जेणेकरून शेतकºयांना सात बारा, खाते उतारा, ६ ड च्या नोंदी मिळविण्यासाठी धावपळ होणार नाही व देशमाने येथे हेलपाटे पण मारावे लागणार नाही. त्यामुळे मानोरी बुद्रुक येथे तलाठ्याची नियुक्ती करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे. मानोरी बुद्रुक येथे जवळपास चारशे शेतकरी खातेदार असून, देशमाने कार्यालयात तलाठी कधी येतात ? हे माहीत नसल्याने शेतकरीवर्ग अर्धा दिवस तलाठ्याच्या प्रतीक्षेत बसून राहत आहे. मानोरी हे अंतर तीन किलोमीटर असल्याने या रस्त्याला आधीच वाहनांची गैरसोय असल्याने देशमानेला जाणेही काहींना कठीण होत आहे. एकीकडे आॅनलाइन उतारा कुठे मिळतो तर कुठे मिळत नाही, आणि मिळाला तरी त्यावर सही घेण्यासाठी तब्बल दहा-बारा दिवसांनी एकदा तलाठी येऊन सही केल्यावर मिळत आहे. त्यामुळे शेतकºयांना शासकीय योजनेचा लाभ घेण्यास विलंब होत आहे. येथे कार्यरत असलेल्या ग्रामपंचायत कार्यालयाचे ग्रामसेवक बाळासाहेब कुशारे हे येवला तालुक्यातील पुरणगाव व मानोरी अशा दोन गावांचे कामकाज बघत आहे. मग तलाठी दोन गावांचे कामकाज बघू शकत नाही का ? असा सवाल उपस्थित होत आहे.
मानोरीत शासकीय कार्यालये झाल्या शोभेच्या वस्तू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2018 12:11 AM