नाशिक : राज्यात सर्वदूर पडत असलेला मुसळधार पाऊस व निर्माण झालेली पूरपरिस्थितीमुळे कोळशाची वाहतूक ठप्प झाली असून, त्याचा फटका एकलहरे औष्णिक वीजनिर्मिती केंद्राबरोबरच राज्यातील अन्य केंद्रांची वीजनिर्मिती ठप्प झाली आहे. एकलहरे येथील २१० मेगावॉट क्षमतेचे वीजनिर्मितीचे तीनही संच कोळशाअभावी करावे लागले आहेत.
राज्यात पडणाऱ्या संततधार पावसामुळे अनेक ठिकाणची वाहतूक ठप्प झाली. तसेच कोळसा ज्या खाणीतून येतो तेथेही मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने कोळसा भिजला आहे. त्यामुळे वीजनिर्मिती केंद्रांना पुरविण्यात येणारा कोळसा ओलाचिंब होऊन येतो. ओला कोळसा जाळण्यासाठी मोठ्या प्रमाणात आॅइलचा वापर करावा लागतो. त्याचा खर्च केंद्रांना परवडत नाही. त्यामुळे सद्या जो कोळशाचा साठा आहे तो ओला असल्याने क्रशरमध्ये क्रश होत नसल्याने एकलहरे येथील संच क्रमांक ४ व ५ हे १ आॅगस्टपासून बंद करण्यात आले, तर संच क्रमांक ३ हा सोमवार, दि. ५ आॅगस्टला बंद करण्यात आला. त्यामुळे ६३० मेगावॉट वीजनिर्मितीची क्षमता असलेल्या या तीनही संचांतून होणारी वीजनिर्मिती शून्यावर आली आहे. सध्या एकलहरे वीज केंद्रात ४० हजार मेट्रिक टनच्या जवळपास कोळसा आहे. तीनही संच फूल लोडवर सुरू असले तरी सरासरी तीन ते चार दिवस पुरेल एवढाच स्टॉक आहे. मात्र मुसळधर पावसामुळे कोळशाचे रेक ओलेचिंब भिजून येतात. त्यामुळे सध्यातरी हा कोळसा वापरता येणार नाही, असे सूत्रांचे म्हणणे आहे. एकलहरे प्रमाणेच राज्यातील अन्य वीजनिर्मिती केंद्राची वीजनिर्मितीत पावसामुळे गेल्या काही दिवसांपासून घट झाली असून, अनेक केंद्रे क्षमतेपेक्षा कमी वीजनिर्मिती करीत आहेत. सध्या कोल, गॅस, हायड्रो व सोलर मिळून महाजेनकोची वीजनिर्मिती ३,५७१ मेगावॉट आहे व खासगी क्षेत्रातील जिंदाल, अदाणी व इतरांची एकूण ५०५५ मेगावॉट वीजनिर्मिती अशी एकूण ८,६२६ मेगावॉट वीज राज्यात आहे. महानिर्मितीसह खासगी व इतर स्रोतांची मिळून १०,१२७ मेगावॉट वीज आहे. त्या तुलनेत राज्याची मागणी १४,२६३ मेगावॉट इतकी आहे. राज्याची मागणी लक्षात घेता सुमारे चार हजार मेगावॉट विजेचा तुटवडा भासतो. गरज भासलीच तर हा तुटवडा केंद्र शासनाच्या वाट्यातून भरून काढला जातो, मात्र सध्या पावसाळा असल्याने विजेची मागणीही कमी असल्याचे सांगितले जाते.