वणी : दुष्काळी स्थितीमुळे टमाटा उत्पादनात आलेली घट व लागवड केलेल्या क्षेत्रात अनुत्पादक बियाण्यांमुळे टमाटा उत्पादनावर प्रतिकूल परिणाम झाल्याने टमाट्याच्या आवकेत मोठ्या प्रमाणावर तुटवडा जाणवू लागला आहे. गरजपूर्तीसाठी कर्नाटकमधील बेंगळुरू भागातून टमाटा खरेदी करावा लागत असल्याची माहिती टमाटा व्यापारी व निर्यातदार संजय उंबरे यांनी दिली. टमाटा खरेदी-विक्रीच्या माध्यमातून सध्या कर्नाटकमध्ये कोट्यवधी रुपयांची उलाढाल होत आहे. महाराष्ट्रात टमाटा उत्पादित होऊन प्रतिदिन कोट्यवधी रुपयांची उलाढाल होते हा प्रतिवर्षीचा अनुभव; मात्र वेळेवर पाऊस झाला नाही तसेच लागवड केलेल्या काही क्षेत्रांमध्ये सदोष बियाण्यांमुळे उत्पादनात घट आली. नाशिक जिल्हा टमाटा उत्पादनात अग्रेसर असून, उत्पादनात घट झाल्याने परराज्यातून टमाटा खरेदी करून गरज भागविली जात आहे. सद्यस्थितीत पुणे भागातील नारायणगाव व संगमनेर भागातून सुमारे २५ ट्रक टमाट्याची आवक होत आहे. स्थानिक ठिकाणी टमाटा अपुरा पडतो, सध्या कर्नाटक राज्यातील बेंगळुरू भागातील कोल्हार, चिंतामणी, अनंतपुरम, मदनपल्ली, ओसूर भागात मोठ्या प्रमाणावर टमाटा उत्पादक विक्रीसाठी आणतात. हा टमाटा खरेदी करण्यासाठी महाराष्ट्र नाही, तर राजस्थान, पंजाब, गुजरात, दिल्ली उत्तर प्रदेश, ओरिसा या भागात किमान प्रतिदिन एक हजार ट्रक म्हणजेच एक कोटी साठ लाख किलो टमाटा खरेदी विक्रीची उलाढाल होत असल्याची माहिती संजय उंबरे यांनी दिली. प्रतिकिलोस ४० ते ४५ रुपये दर मिळत असल्याने कोट्यवधी रुपयांची उलाढाल होत आहे. सदरच्या आर्थिक उलाढालीची गती महिनाभर राहणार असल्याची माहिती त्यांनी दिली. कारण महाराष्ट्रातील टमाटा एक महिन्यानंतर उत्पादित होईल व तेव्हा परराज्यातील खरेदीदार महाराष्ट्राकडे वळतील. सद्यस्थितीत पडणारा पाऊस कृषी उत्पादनास विशेषत: टमाट्यास पोषक मानण्यात येत असल्याने तोपर्यंत महागड्या टमाट्याची चव चाखावी लागणार आहे. (वार्ताहर)
टमाटा उत्पादनात घट
By admin | Published: July 10, 2016 10:03 PM