नाशिक : दररोज बाधितांपेक्षा कोरोनामुक्त होणाऱ्यांच्या संख्येत वाढ होत असल्यानेच गत पंधरवड्यापासून उपचारार्थी रुग्णसंख्या झपाट्याने खाली येत आहे. रविवारी (दि.२३ मे) उपचारार्थी रुग्णसंख्या १६ हजारांखाली घसरली असून २१ मार्चनंतर तब्बल दोन महिन्यांच्या अंतराने उपचारार्थी संख्या १६ हजारांपेक्षा कमीच्या पातळीवर आली आहे. तर २५ एप्रिलपासून महिनाभरात उपचारार्थींमध्ये तब्बल ३२ हजारांची घट झाली आहे.
शहर आणि जिल्ह्यात कोरोनाबाधितांच्या रुग्णसंख्येत झपाट्याने घट येत आहे. विशेषत्वे जिल्ह्यातील उपचारार्थी कोरोनाबाधितांची संख्या वाढत जाऊन एप्रिलच्या अखेरीस पन्नास हजारांनजीक पोहोचली होती. मात्र, मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून त्यात काही प्रमाणात घट येऊ लागली आहे. ग्रामीणच्या तुलनेत शहरातील उपचारार्थी रुग्णांची संख्या अधिक वेगाने घटत आहे. ग्रामीणमध्ये अद्यापही उपचारांची तितकीशी व्यवस्था नसल्याने ग्रामीणमधील रुग्णसंख्या आटोक्यात येण्यास अजूनही काही कालावधी लागण्याची चिन्हे आहेत.
इन्फो
महिनाभरात वेगाने घट
जिल्ह्यात २५ एप्रिलला कोराेनाच्या एकूण उपचारार्थी रुग्णांची संख्या तब्बल ४८,५७१ होती. त्यात एप्रिल अखेरीस अल्पशी तर मे महिन्यामध्ये वेगाने घट होऊ लागली. त्यामुळेच गत ३० दिवसांमध्ये एकूण उपचारार्थी रुग्णसंख्येत ३२ हजारांहून अधिक घट झाल्याचे दिसून येत आहे. जिल्ह्यात करण्यात आलेल्या लॉकडाऊनचाच हा सकारात्मक परिणाम आहे.
इन्फो
दोन महिन्यापूर्वीच्या स्तरावर
रविवारी (दि. २३) एकूण उपचारार्थी संख्या १५,९५९ या स्तरावर पोहोचली आहे. यापूर्वी २० मार्चला एकूण उपचारार्थी संख्या १५,२४२ इतकी होती. म्हणजे रविवारी उपचारार्थी संख्या तब्बल दोन महिन्यापूर्वीच्या स्तरावर आली आहे. अशाच क्रमाने एकूण उपचारार्थी रुग्णांची संख्या झटू लागल्यास मे महिन्याअखेरपर्यंत उपाचारार्थी रुग्णसंख्या अजून किमान तीन-चार हजारांनी खाली येण्याची शक्यता आहे.