कळवण (मनोज देवरे) : तालुक्यात खरीप (पावसाळी ) हंगामात तालुक्यात सुमारे ४६ हजार हेक्टर क्षेत्रावर पिकांचे उत्पादन घेतले जाते. खरीप हंगामात भात, ज्वारी, बाजरी, नागली व मका ही तृणधान्य पिके, तर तूर मूग, उडीद ही कडधान्ये पिके घेतली जातात. खरीप हंगामात मका व सोयाबीन ही नगदी पिके म्हणून पुढे आली आहेत. निरनिराळ्या भाजीपाला पिकांचे उत्पादन घेतले जात आहे. ७० टक्के खरीप पिकांची पेरणी झाली असून, यात मका, सोयाबीन, भात, बाजरी या मुख्य पिकांचा समावेश आहे.
पावसाचे उशिरा होणारे आगमन, ऑगस्ट महिन्यातील पावसाचा खंड, पावसाचे अनियमित वितरण या कारणाने खरीप हंगामातील मुख्य पिकांची उत्पादनात घट होत आहे. हलक्या जमिनी, उंचसखलपणा, पारंपरिक शेती, सूक्ष्म नियोजन पद्धतीचा कमी अवलंब, मजूर, वीज, बाजारभावाचा चढ-उतार या शेती व्यवसायातील प्रमुख समस्या आहेत.
कळवण तालुक्यात आतापर्यंत ६० ते ६५ टक्के पाऊस झाला असून, जून महिन्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला आहे, त्यामुळे तालुक्यातील शेतकरी दमदार पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. अल्पशा पावसावर तालुक्यातील शेतकऱ्यांनी खरीप पिकाची पेरणी केली असून, तालुक्यात सरासरी ४६ हजार हेक्टर क्षेत्र वहितीलायक आहे. ७० टक्के खरीप पिकांची लागवड झाली असून, यात मका, सोयाबीन, भात, बाजरी या मुख्य पिकांचा समावेश आहे.
-----------------------------
पेरणी क्षेत्रात वाढ
मागील आठवड्यात बरा पाऊस झाल्याने पेरणी क्षेत्र वाढले आहे. यावर्षी उशिरा पाऊस आल्याने मक्याचे क्षेत्र कमी होऊन सोयाबीन, भाजीपाला क्षेत्र वाढण्याची शक्यता आहे. खते व बियाणे यांचा पुरवठा पुरेशा प्रमाणात आहे.
शासकीय अहवालानुसार तालुक्यात फक्त २६९८४ हेक्टर क्षेत्रात ५८.३६ टक्के पेरणी झाल्याचा अहवाल आहे. त्यात तृणधान्य १३८०५ हेक्टर, कडधान्य २१९७ हेक्टर, तेलबिया ९३९९ हेक्टर पेरणी झाली आहे. यात भात - ४८६ हेक्टर, नागली - १४४ हेक्टर, बाजरी - १३७४ हेक्टर, मका - १३१५० हेक्टर, वरई - ४६ हेक्टर, तूर -७६४ हेक्टर, मूग - ४२९ हेक्टर, उडीद ५८१ हेक्टर, कुळीद १४५ हेक्टर, मटकी १२४ हेक्टर, चवळी १५३ हेक्टर, भुईमूग १४१२ हेक्टर, तीळ ७६ हेक्टर, खुरसणी ११९ हेक्टर, सोयाबीन ७७९२ हेक्टर पेरणी झाली आहे.
----------------
कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना मार्गदर्शन
खरीप हंगामातील पिके, बियाणे, पेरणी, लागवड, खते, फवारणी आदी शेतीविषयक कामांसंदर्भात व विविध योजनांचे मार्गदर्शन तालुका कृषी यंत्रणेने तालुक्यातील शेतकऱ्यांना करावे अशी सूचना आमदार नितीन पवार यांनी कृषी विभागाला केली. तालुका कृषी अधिकारी विजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कृषी विभागाच्या यंत्रणेने तालुक्यात गावोगावी जाऊन शेतकऱ्यांच्या भेटी घेऊन खरीप हंगामातील पीक लागवडीसह खते व बियाणांबाबत मार्गदर्शन केल्याचा फायदा शेतकऱ्यांना झाला.
------------------
ठिबक सिंचनसह विविध योजनांची माहिती
कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव आणि संचारबंदीच्या परिस्थितीत खरीप हंगाम तोंडावर आल्यामुळे शेतकऱ्यांना खरीप पिके, खते, बियाणे, पेरणी, मशागत आदी शेतीविषयक विषयांवर मार्गदर्शन करणे आवश्यक असल्यामुळे तालुका कृषी अधिकारी कार्यालयाने शेतीविषयक विविध विषयांवर शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.
शेतकरी बचत गट यांना बांधावर खते, बियाणे, बीबीएफ यंत्राद्वारे पेरणी, एक गाव एक वाण, शेतीशाळा, रिसोर्स बॅक, मग्रारोहयोअंतर्गत बांधावर वृक्षलागवड, सलग लागवड, गांडूळ युनिट, नॅडेफ, शेततळे, तुती लागवड, भातासाठी युरिया ब्रिकेट्चा वापर, ठिबक सिंचन, वृक्षलागवड, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर रोपवाटिका, महाडीबीटी आदी विविध योजनांचे कोरोना संसर्गाच्या सर्व नियमांचे पालन करून गावनिहाय प्रशिक्षण दिले.