येवला : सुसंस्कृत व संस्कारक्षम पिढी घडविण्यासाठी ज्ञानमंदिराची नितांत गरज असून, समतेचे व अहिंसेचे तत्त्वज्ञान लोकापर्यंत पोहचविणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन अंगणगाव येथील श्रीकृष्ण ज्ञानमंदिर वर्धापन दिनानिमित्त आयोजित दीक्षा विधी सोहळा व कीर्तन सप्ताहाच्या सांगता समारोहप्रसंगी प.पू. मोहनराज अमृते यांनी केले. गेल्या पाच दिवसांपासून अनेक कीर्तनकारांच्या अमृतवाणीमधून महानुभाव पंथाचे संस्थापक भगवान श्री चक्रधरस्वामींचे तत्त्वज्ञान पोहचविण्याचे काम सुरू होते. संध्याकाळी दररोज श्रीकृष्ण मूर्तीचे पूजन, विडावसर करून रात्री कीर्तनाचा कार्यक्रम होत असे. या विज्ञान युगातील पिढी व्यसनाकडे वळलेली दिसते. अंधश्रद्धा वाढलेली दिसते. हिंसेचे प्रमाण वाढलेले दिसते. या सर्वांपासून दूर करण्यासाठी स्वामींचे समतेचे व अहिंसेचे तत्त्वज्ञान लोकापर्यंत पोहचविण्यासाठी गरजेचे आहे. यासाठी अशा वर्धापन दिनाची व कीर्तन सप्ताहाची आवश्यकता आहे, असे प्रतिपादन अमृते बाबांनी केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अखिल भारतीय महानुभाव परिषदेचे उपाध्यक्ष सुकणेकर बाबा होते. आयोजन श्रीकृष्ण ज्ञानमंदिराचे संचालक दत्तराज चिरडे यांनी केले होते. यानिमित्ताने श्रीकृष्णमूर्तीसह संतमहंतांची मिरवणूक काढण्यात आली. तसेच श्रीकृष्ण मूर्तीस मंगल-स्नान, गीतापाठ पारायण झाले. सकाळी नऊ वा. प.पू. मनोहरशास्री सुकेणेकर यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न झाले. धर्मसभा मंडप उद्घाटन अमरावती येथील प.पू. मोहनराज अमृते यांच्या हस्ते झाले. दीपप्रज्वलन मराठे बाबा गंगापूर व बाळासाहेब मेहेरकर यांच्या हस्ते झाले. प्रास्ताविक साहेबराव महानुभाव यांनी केले. या सोहळ्याचे मुख्य आकर्षण म्हणजे सन्यास दीक्षा विधी सोहळा गोपीनाथ अमृते यांनी दत्तराज बाबा चिरडे यांना निमित्त करून हदगाव येथील दत्ताबापू विध्वांश यांच्या हस्ते सन्यास विधी सोहळा झाला. कार्यक्रमासाठी वाल्हेराज बाबा, अजनगावकर बाबा, मनीषदादा बीडकर यांच्यासह प्रकाश नन्नावरे, अंबादास बनकर, विठ्ठल आठशेरे आदी उपस्थित होते.
श्रीकृष्ण ज्ञानमंदिर वर्धापन दिनानिमित्त दीक्षा विधी सोहळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2018 12:27 AM