सप्तश्रृंग गडावर भाविकांच्या सोयीसाठी विविध ११ प्रकल्पांचे निर्माण करण्यात आले असून, त्यातील काही प्रकल्पांचे उद्घाटन व लोकार्पण यावेळी करण्यात आले. प्रकल्पासाठी योगदान देणाऱ्या प्रकल्प वास्तुविशारद, नूतन ग्रामपालिका सदस्य, उपसमिती सदस्य, पुरोहित वर्ग आदींचे सत्कार विश्वस्त संस्थेच्या वतीने करण्यात आले. या लोकार्पणात प्रामुख्याने आपत्कालीन मार्ग, श्री भगवती सभा मंडप कार्यालय, कालभैरव मंदिर, श्री राधाकृष्ण मंदिर, अन्नपूर्णा प्रसादालय किचन नूतनीकरण, श्रीराम टप्पा ते उंबर टप्पा पायरी बांधकाम, प्रशासकीय व चिंतन हॉल, मुख्य प्रवेशद्वार, सप्तशृंगी व राजराजेश्वरी इमारत नूतनीकरण तसेच श्री गणेश मंदिर, दीपमाळ, नारळ व जावळ अर्पण केंद्र आदीसह परिसर विकसित करणे आदी प्रकल्पांचा समावेश आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कळवण तहसीलदार तथा विश्वस्त बी.ए. कापसे तर प्रमुख उपस्थितीत विश्वस्त ॲड. ललित निकम, ॲड. दीपक पाटोदकर, मनज्योत पाटील, प्रशांत देवरे, भूषणराज तळेकर, सरपंच रमेश पवार आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन विश्वस्त संस्थेचे व्यवस्थापक सुदर्शन दहातोंडे यांनी केले तर पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विश्वस्त संस्थेचे व्यवस्थापक श्री सुदर्शन दहातोंडे, कार्यकारी अधिकारी श्री भगवान नेरकर, बांधकाम विभाग प्रमुख श्री नानाजी काकलीज, जनसंपर्क अधिकारी भिकन वाबळे व सर्व विभाग प्रमुखांसह कर्मचारी वर्गाने विशेष परिश्रम घेतले.