लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : आषाढ अमावास्येलाच दीप अमावास्या असेही म्हटले जाते. यानिमित्त रविवारी (दि. २३) घरोघरी गृहिणींनी वेगवेगळे दिवे घासून-पुसून स्वच्छ करून त्याचे पूजन केले. तसेच दीप अमावास्येनिमित्त मंदिरांत व घरोघरी सायंकाळी दीवे लावण्यात आले. दरम्यान, पावसाच्या संततधारेमुळे गोदावरीला पूर आल्याने दक्षिणगंगा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गोदावरी मातेची पूजा करून दीपदान करण्याची पर्वणी भाविकांना साधता आली नाही. तरीही काही भाविकांनी गोदा काठालगतच्या काही मंदिरांत जाऊन दीप लावले. शहरात घरोघरी रविवारी सकाळी गृहिणींनी पाटावर दिवे मांडून प्रज्वलित केले. तसेच फुले वाहून त्याचे पूजन करण्यात आले. या दिवशी गूळ व कणकेचे उकडलेले दिवे तयार करून त्याचा नैवेद्य दाखविण्याची प्रथा आहे. तर काही ठिकाणी कणकेचे दिवे करून त्यात साजूक तूप आणि कापसाची वात लावून दिवे लावण्याची प्रथा आहे.
दीप अमावास्येला उजळले दीप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2017 12:22 AM