नाशिक : ‘शुभं करोति कल्याणम आरोग्यं धनसंपदा, शत्रुबुद्धी विनाशाय दीपज्योति नमोस्तुते’ म्हणत शहरात सर्वत्र दीप अमावस्या साजरी करण्यात आली. घरोघरी सकाळपासून दिव्यांची पूजा, आरती, नैवेद्य, गोडाधोडाचे पदार्थ यांची रेलचेल पहायला मिळाली तर शाळांमध्येही दीपपूजन करून विविध कार्यक्रमांद्वारे दीप अमावस्या साजरी झाली.या अमावस्येलाच दिव्याची आवस किंवा दीप अमावस्या असे म्हटले जाते. भारतीय संस्कृतीमध्ये दिवा, ज्योती, वात, फुलवात यांना महत्त्वाचे स्थान आहे. सकाळपासून घरोघरी गृहिणींची लगबग पहायला मिळाली. त्यांनी आदल्या दिवशी घरातील दिवे, समई, कंदील आदी घासून-पुसून स्वच्छ करून ठेवले होते. सकाळी पाटावर दिवे मांडून, प्रज्वलित करून, फुले वाहून, पूजा करुन, नैवेद्य दाखविला. तसेच गंगाघाटावर पाण्यात दिवे सोडण्यासाठीही भाविकांची गर्दी पहायला मिळाली. प्रशासनानेही सज्जता केली होती. शाळांमध्ये दिव्यांची पूजा करून शिक्षकांनी विद्यार्थ्यांना दिव्यांचे महत्त्व, प्रकाशाचे महत्त्व याविषयी सविस्तर माहिती दिली. परिसरातील पाने, फुले गोळा करून दिव्यांची सजावट केलेली पहायला मिळाली. विद्यार्थी पारंपरिक पोषाख करून आले होते. घरोघरी शिरा, गव्हाची खिर, तांदळाची खीर, गोड दिवे आदी पदार्थ करण्यात आले होते. उद्यापासून श्रावण सुरू होत असल्याने अमावस्येच्या पार्श्वभूमीवर गंगाघाटावर दीपदान, स्नान व देवदर्शनासाठी गर्दी केली होती.
दीप अमावस्येनिमित्त पूजन; धार्मिक कार्यक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2018 1:37 AM