ओझर : पाकिस्तानच्या आयएसआय या गुप्तहेर संघटनेला भारतीय लढाऊ विमानांबाबत गोेपनीय माहिती पुरवल्याप्रकरणी एसटीएसच्या ताब्यात असलेला एचएएलचा कर्मचारी दीपक शिरसाठ याची कसून चौकशी केली जात असून काही दिवसांपूर्वी त्याला कारखान्यात आणून अधिक माहिती घेण्यात आल्याचे सूत्रांकडून समजते.हनी ट्रॅपमध्ये अडकलेल्या दिपक शिरसाठ याने पाकिस्तानी गुप्तहेर संघटनेला महत्वाची माहिती पुरविल्याप्रकरणी सध्या शिरसाठ एटीएसच्या ताब्यात आहे. त्याची या प्रकरणाची सखोल चौकशी केली जात असून काही दिवसांपूर्वी त्याला एचएएल कारखान्यात तो जेथे काम करत होते, त्याठिकाणी एटीएस घेऊन आल्याचे समजते. शिरसाठ हा नेमका कोणत्या व कशा प्रकारे गोपनीय माहिती पोहोचवत होता, तो ज्या शॉपला काम करायचा तेथील त्याची जागा, वैयक्तिक लॉकर आदी बाबींची चौकशी करण्यात आल्याचे समजते. त्याला इतर विभागातील आणखी कुणी सामील आहे काय तसेच हनी ट्रॅप प्रकरणी त्याने सोशल मीडिया द्वारे अन्य कुणाला माहिती पुरवली हा देखील तपास पथक करत आहे. त्यामुळे आणखी महत्वाची माहिती हाती लागण्यासाठी त्याच्या कोठडीत वाढ करावी अशी मागणी एटीएसने केल्याचे वृत्त आहे.