नाशिक : दीपावली म्हणजे दिव्यांचा उत्सव या प्रकाश उत्सवानिमित्त शहरात दरवर्षीप्रमाणे यंदाही ठिकठिकाणी पाडवा पहाट कार्यक्रमांची मैफल रंगणार आहे. पहाटेच्या गारव्यात आनंददायी शब्दसुरांचा हा उत्सव नाशिककरांसाठी आगळी पर्वणी ठरणार आहे.सार्वजनिक उत्सव समिती व आदिशक्ती, स्त्रीशक्ती प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवारी (दि. ८) दीपावली पाडवा पहाट कार्यक्रम होणार असून, यात प्रसिद्धगायक मराठी गीते सादर करणार आहेत. इंदिरानगर येथील समर्थ महिला मंडळाच्या वतीने गुरुवारी (दि. ८) पाडवा पहाट कार्यक्रमात पंडित प्रसाद दुसाने यांच्या शास्त्रीय गायनाच्या मैफलीचे आयोजन करण्यात आले आहे.लाडशाखीय वाणी मित्रमंडळ व लाडशाखीय वाणी समाज हितगुज महिला मंडळाच्या वतीने गुरुवारी पाडवा पहाटनिमित्त वाणी कलाकार संघटन प्रस्तृत ‘उधळीत शतकिरणा’ या सुरेल गीतांच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. बलिप्रतीपदाच्या दिवशी पाडवा पहाट होणार असून, यावेळी सर्वांनी मेजवानीचा आनंद घ्यावा, असे आवाहन सचिन बागड, शोभा कोतकर, सुनील मुसळे, विठ्ठल मोराणकर आदींनी केले आहे. मंगलदीप प्रस्तुत दीपावली पाडवा पहाट कार्यक्रम गुरुवारी (दि. ८) आयोजित करण्यात आला आहे. प्रसिद्ध गायिका पद्मजा फेणाणी- जोगळेकर यांची गीत मैफल रंगणार आहे. या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन निमंत्रक आमदार प्रा. देवयानी फरांदे यांनी केले आहे. नसती उठाठेव मित्र परिवार यांच्या वतीने सूरमयी दीपावली पहाटचे बुधवारी (दि. ७) आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात गायिका विदूषी अंजना नाथ गायन सादर करणार असून तबलासाथ अजिंक्य जोशी तर संवादिनीवर सुभाष दसककर हे साथ करणार आहेत. श्रद्धा गोदा फाउंडेशनच्या वतीने यंदा गुरुवारी (दि. ८) सांज पाडवा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात गायिका सावनी रवींद्र, स्वप्नील गोडबोले, विश्वदा जाधव आदींचे गायन रंगणार आहे, अशी माहिती फाउंडेशचे अध्यक्ष सुरेश अण्णा पाटील यांनी दिली.
शब्दसुरांच्या संगे रंगणार दीपावली, पाडवा मैफली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 06, 2018 1:25 AM