लोकमत न्यूज नेटवर्कदिंडोरी : कादवा सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावरील प्राथमिक विद्यामंदिर राजारामनगर शाळेत दीप अमावास्येनिमित्त दीपपूजनाचा कार्यक्रम उत्साहाने साजरा करण्यात आला. याप्रसंगी अश्मयुगीन काळापासून आजच्या आधुनिक युगापर्यंत प्रकाशाच्या साधनांची स्थित्यंतरे- शेकोटी, दगडी दिवा, मातीची पणती, कंदील, पलुते, विजेरी, आजचे आधुनिक इलेक्ट्रिक बल्ब व इतर साधने अशा वेगवेगळ्या दिव्यांचे प्रदर्शन मांडण्यात आले व शालेय विद्यार्थिनींनी पारंपरिक वेशभूषा परिधान करून दिव्यांचे अर्थातच प्रकाशाचे पूजन केले. दिवे आपल्या जीवनातील अंधार दूर करून आपल्याला प्रकाश देतात, म्हणून त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा सण असे मुख्याध्यापक अशोक शिंदे यांनी याप्रसंगी सांगितले व उर्जाबचतीचा संदेशही देण्यात आला. यावेळी शिक्षक कल्पना गटकळ, सुनीता आहेर, सुरेखा कदम, दीपक भालेराव, अशोक गांगुर्डे आदी उपस्थित होते.
दीप अमावास्येनिमित्त दीपपूजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2017 12:50 AM