ममदापूर (ता. येवला) : येथील दत्तात्रय साबळे यांच्या विहिरीत पडल्याने हरणाचा मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी रात्री घडली. दत्तात्रय साबळे शुक्रवारी सकाळी शेतात गेले असता विहिरीत मृतावस्थेतील हरीण त्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी जालिंदर साबळे यांच्या मदतीने वनसमिती अध्यक्ष गणेश गायकवाड यांना त्याची माहिती दिली. त्यानंतर विहिरीत पडलेल्या हरणाला दोरीच्या साहाय्याने बाहेर काढण्यात आले. वन अधिकाऱ्यांनी पंचनामा केला. दरम्यान, या भागात हरणांची संख्या मोठ्या प्रमाणात असल्यामुळे रस्ता ओलांडताना किंवा अन्य प्राण्यांच्या हल्ल्यातून जीव वाचविताना हरणांना आपला जीव गमवावा लागल्याच्या अनेक घटना यापूर्वी घडल्या आहेत. त्या कमी होण्याच्या दृष्टीने वनविभागाने वेळीच नियोजन करण्याची मागणी निसर्गप्रेमींनी केली आहे. हरणांना जीव गमवावा लागू नये यासाठी वनविभागातील वनक्षेत्रांना संरक्षक जाळ्या तयार करून त्यांच्या चारा-पाण्याचा प्रश्न मार्गी लावण्याची मागणी वनसमितीचे अध्यक्ष गणेश गायकवाड यांनी केली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे हरणांकडून होणारे नुकसान टळले जाईल व त्यांचे प्राण वाचले जातील, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे. (वार्ताहर)
ममदापूर येथे हरणाचा मृत्यू
By admin | Published: October 01, 2016 12:36 AM