लोहोणेर : येथील एका शाळेच्या आवारात पाण्याच्या शोधार्थ आलेल्या हरणाच्या पाडसाला संस्था अध्यक्षांनी समय सूचकता दाखवत सुखरूप वन विभागाच्या ताब्यात दिल्याने त्याला जीवदान मिळाले. मंगळवारी दुपारी येथील फ्लेमिंगो इंटरनॅशनल स्कूलच्या आवारात हरणाचे पाडस आले. हे पाडस पाण्याच्या शोधात चुकून शाळेच्या आवारात पोहोचले. यावेळी शाळेचे अध्यक्ष आबासाहेब देशमुख शाळेतच होते. त्यांनी समय सूचकता दाखवत चुकून दाखल झालेला हा अनोळखी पाहुणा बाहेर जाऊन कुत्रे अथवा इतर हिंस्त्र जनावरांची शिकार होऊ नये, यासाठी कर्मचाऱ्यांना शाळेचे मुख्य प्रवेशद्वार बंद करण्यास सांगितले तसेच तत्काळ वन विभागाला याबाबत माहिती दिली.
माहिती मिळताच वनविभागाचे कर्मचारी तुषार भामरे व राकेश गायकवाड शाळेत हजर झाले. त्यांनी पाडसाला ताब्यात घेतले. यावेळी फ्लेमिंगो स्कूलचे अध्यक्ष आबासाहेब देशमुख, रमेश आहिरे, गणेश परदेशी, संदीप परदेशी, राकेश सोनवणे, शिवाजी निकम, हरी परदेशी यांनी वन विभागाचे आभार मानले. या पाडसाला सुरक्षित ठिकाणी सोडण्यात येईल, असे वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी सांगितले.
-----------