नाशिक : महापालिकेने मिळकत कर थकबाकीदारांविरुद्ध ढोल बडविण्याची मोहीम सुरू केल्याने त्याचा बड्या थकबाकीदारांनी चांगलाच धसका घेतला आहे. घरापुढे बदनामीचे ढोल वाजण्यापूर्वीच अनेक थकबाकीदारांनी मंगळवारी स्वत:हून महापालिकेशी संपर्क साधत थकबाकीचा भरणा करण्याची तयारी दर्शविली. दरम्यान, मंगळवारी राबविलेल्या मोहिमेत महापालिकेने ७० लाख रुपयांची वसुली केली. महापालिकेने घरपट्टी थकविणाऱ्या बड्या थकबाकीदारांना जाग आणण्यासाठी त्यांच्या घर व दुकानांपुढे जाऊन ढोल बडविण्याची मोहीम सुरू केली आहे. महापालिकेच्या या मोहिमेचा थकबाकीदारांनी धसका घेतला आहे. ढोल वाजवून बदनामी होतानाच माध्यमांमध्येही नावे झळकत असल्याने अनेक थकबाकीदारांनी मंगळवारी स्वत:हून थकबाकी भरण्याची तयारी दर्शविली आणि ढोलपथक न पाठविण्याची विनंती केली. दरम्यान, मंगळवारी महापालिकेने सहाही विभागात ढोल पथक पाठविले. विभागीय अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली सुमारे ५० ते ६० थकबाकीदारांच्या घरासमोर ढोल- ताशा वाजवण्यात आला. या मोहिमेत नाशिकरोड विभागात राजराजेश्वरी मंगल कार्यालयाकडून ११ लाख २० हजार, बिटको चॅरिटेबल ट्रस्ट मुक्तिधामकडून ३ लाख १७ हजार, नाशिक पूर्व विभागातून अलय कन्स्ट्रक्शनकडून ६ लाख ८५ हजार, स्पार्क इन्फ्राकडून १ लाख ८६ हजार, नाशिक ब्लड बॅँकेकडून १ लाख ४७ हजार, हकीम काचवालाकडून १ लाख ३ हजार, पंचवटी विभागातून विठ्ठलराव चौगुलेंकडून २ लाख २५ हजार, विठाबाई धोत्रेंकडून २ लाख ९ हजार, विमलबाई धात्रक यांच्याकडून १ लाख २० हजार, पश्चिम विभागातून विजय जाधव यांच्याकडून ९७ हजार तर सिडकोतून नरहरी नवले यांच्याकडून ४ लाख रुपये थकबाकी वसूल करण्यात आली. याचबरोबर, पूर्व विभागात श्रीमती पूर्णिमाबेन शहा, विनायककुमार पांडे, एस. एस. करवंदे यांची दुकाने सील करण्यात आली, तर पंचवटी विभागात महेंद्र पवार, मोहन वायखंडे, सिडकोतून आरिफ मोहमंद, नाशिकरोडमध्ये वैतरा बिल्डर्स यांच्या मिळकतींवर जप्तीची कारवाई करण्यात आल्याची माहिती उपआयुक्त रोहिदास दोरकुळकर यांनी दिली. (प्रतिनिधी)
बदनामीचा ढोल वाजण्यापूर्वीच थकबाकीदारांकडून भरणा
By admin | Published: March 08, 2017 1:25 AM