घोटी : अन्यायाच्या विरोधात जे लढतात त्यांना नक्षलवादी म्हणता येणार नाही. कायदा हातात घेऊन काही लोक नक्षलवाद पसरविताना आदिवासी बांधवांना बदनाम करत आहेत. आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे यांनी सुरू केलेला लढा अविरत सुरू राहणार असून, सत्याची कास धरून आदिवासी बांधवांच्या न्याय्य-हक्कांसाठी देशपातळीवर लढा उभारणार असल्याचे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष तथा माजी केंद्रीय मंत्री, खासदार शरद पवार यांनी इगतपुरी तालुक्यातील सोनोशी येथे आयोजित सोहळ्यात केले.
आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे, तसेच धरतीआबा बिरसा मुंडा यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त रविवारी (दि. १४) वासाळीत उभारण्यात येणाऱ्या आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे यांच्या राष्ट्रीय स्मारकाचे भूमिपूजन शरद पवार यांच्या हस्ते झाले. त्यानंतर सोनोशी येथे झालेल्या सभेत पवार बोलत होते. व्यासपीठावर अन्न व नागरी पुरवठा राज्यमंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ, विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, गृह निर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड, वनराज्यमंत्री दत्तामामा भरणे, बिरसा मुंडा ब्रिगेडचे राष्ट्रीय अध्यक्ष सतीश पेंदाम, आमदार माणिकराव कोकाटे, आमदार हिरामण खोसकर, आमदार किरण लहामटे, सुनील भुसारा, आमदार नितीन पवार आदी उपस्थित होते. पवार यांनी सांगितले की, राजकीय हेतूने कार्य न करता आदिवासी समाजाच्या न्याय्य- हक्कांसाठी हा राष्ट्रव्यापी लढा उभारला गेला आहे. आदिवासी बांधव हे पिढ्यानपिढ्या देशाचे मूळ मालक आहेत. जल, जमीन आणि पर्यावरणाचे रक्षण करण्याचे काम आदिवासी बांधवांकडून केले जात आहे. आदिवासी समाजातील इतर घटक यांच्यात अंतर ठेवण्याचे कुठलेही कारण नाही. राघोजी भांगरे, बिरसा मुंडा यांनी जे योगदान स्वातंत्र्यप्राप्तीसाठी दिले, त्याचे स्मरण व जतन भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षांत वर्तमान व पुढच्या पिढीसाठी करण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे. विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी ९ ऑगस्ट हा विश्व आदिवासी दिन शासकीय पातळीवरही आदिवासी दिन म्हणून पाळला जावा यासाठी पाठपुरावा करणार असल्याचे सांगितले, तर गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी आदिवासी बांधवांच्या हक्काच्या जमिनी परत मिळवून देण्यासाठी शासन वचनबद्ध असल्याचे सांगितले. स्वागताध्यक्ष सतीश पेंदाम यांनी राघोजी भांगरे यांच्या बलिदानाची गाथा मांडली. दरम्यान, बिरसा ब्रिगेडच्या माध्यमातून राज्यव्यापी सांस्कृतिक महोत्सवाचे आयाेजन करण्यात आले होते. या वेळी विविध ठिकाणावरून आलेल्या कला पथकांनी आपली पारंपरिक कला सादर केली.
इन्फो
साहित्य संमेलनात घडणार आदिवासी संस्कृतीचे दर्शन
पालकमंत्री छगन भुजबळ म्हणाले की, देशाला स्वातंत्र्य मिळताना क्रांतिवीर राघोजी भांगरे यांचेही योगदान अविस्मरणीय व अतुलनीय असे आहे. राघोजी भांगरे यांच्या स्मारकाच्या रुपाने स्वातंत्र्याची ज्योत तेवत राहील. नाशिक येथे होत असलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात आदिवासी संस्कृतीचे प्रदर्शन लावण्यात येऊन जगभरातून येणाऱ्या नागरिकांना येथील आदिवासी संस्कृतीचे दर्शन करून देण्यात येईल. तसेच कळसूबाई शिखरावर रोप-वेच्या माध्यमातून आदिवासी भागातील पर्यटनालाही चालना देण्यात येईल, असेही भुजबळ यांनी सांगितले.