प्रकाश गुडघे ममदापूरयंदा राजापूर गण अनुसूचित जाती महिला राखीव झाल्याने गणातून इच्छुक असलेल्या मातब्बर नेते मंडळींची चांगलीच पंचाईत झाली आहे. त्यामुळे बऱ्याच दिवसांपासून मतदारांची जुळवाजुळव करणाऱ्या नेत्यांना आता अनुसूचित जाती महिलेला मदत करावी लागणार आहे. विशेष म्हणजे स्थापनेपासून हा गण सभापतिपदापासून दूर राहिला आहे.मागील पंचवार्षिकला जनरल पुरुष पोपट आव्हाड यांना निवडून दिले होते. या गणातील बऱ्याच गावांना पूर्वी रस्ते नव्हते; परंतु माजी बांधकाममंत्री छगन भुजबळ यांनी भागात प्रत्येक गावाला जोडणारे रस्ते, पूल बांधल्याने व गणातील प्रत्येक गावात अंगणवाडी इमारत, जनसुविधा योजनेअंतर्गत राजापूर, ममदापूर, रेंडाळा, खरवंडी, रहाडी, कोळम या ठिकाणी नवीन ग्रामपंचायत कार्यालय, सभामंडप इत्यादी कामे भुजबळ यांनी केल्याने मागील निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार या गणातून विजयी झाले होते.राजापूर गणात राजापूर, ममदापूर, सोमठाण जोश, पन्हाळसाठे, कोळगाव, वाईबोथी, न्याहारखेडा खु., न्याहारखेडा बु., रेडाळा, रहाडी, खरवंडी, देवदरी, वाघाळा, भारम, कोळम खु., कोळम बु., या सोळा गावांचा समावेश आहे. या भागातील सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा पाण्याचा असून, ममदापूर येथील मेळाचा बंधारा हा गेल्या चाळीस वर्षे झाली तसा निवडणुकीचा मुद्दा आहे. गेल्या वर्षी आमदार छगन भुजबळ यांनी साडेसहा कोटी रु पयांचा निधी मंजूर केला आहे; परंतु सदर बंधारा हा वनविभागाच्या हद्दीत असल्याने जमीन हस्तांतरण बाकी असल्याने निधी पडून आहे. तसेच देवदरी येथील देवनाचा प्रकल्प हा अपूर्ण आहे. राजापूर येथील वडपाटी बंधारा मागील वर्षी जिल्हा बँकेचे अध्यक्ष नरेंद्र दराडे व येथील ग्रामस्थांनी श्रमदानातून बांधल्याने काही प्रमाणात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागेल; परंतु शेतीसाठी सद्यस्थितीत मोठ्या प्रमाणात टंचाई निर्माण झाली आहे. या गटावर नरेंद्र दराडे यांचे वर्चस्व राहिले आहे. मागील निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवीण गायकवाड हे जिल्हा परिषद सदस्य तर गणातून पोपट आव्हाड हे राजापूर गणातून विजयी झाले होते. प्रवीण गायकवाड यांनी या भागात बंधाऱ्यामधील गाळ काढणे, राजापूर येथे रुग्णालय तसेच या भागात प्रत्येक गावाना जोडणारे रस्ते प्राथमिक आरोग्य केंद्रे यासह मोठ्या प्रमाणावर कामे केली आहे. या भागात राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवारांना या कामाच्या जोरावर फायदा होईल? की दराडे बंधू संभाजीराजे पवार यांच्या सेनेचा एकत्रितपणे वाट सापडेल याची गणिते बांधली जात आहेत. या गटात साठ टक्के मराठा समाज असून, या गणात मराठा समाज ज्या पक्षाबरोबर असेल त्याच्याबरोबर धनगर, वंजारी, माळी या समाजाचा कल नेहमी दिसून आलेला आहे. या गणातून अद्यापपर्यंत सभापतिपद मिळालेले नाही. राजापूर गण हा सभापतिपदासाठी नेहमी पोरका राहिला आहे.
मातब्बर नेत्यांचा हिरमोड
By admin | Published: February 01, 2017 10:25 PM