नाशिक : पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी मंत्रिपदाची शपथ घेणाऱ्या राधाकृष्ण विखे पाटील आणि जयदत्त क्षीरसागर यांना मंत्रिपदे देऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजकीय भ्रष्टाचार केल्याचा आरोप माजी मुख्यमंत्रीपृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांना अशाप्रकारे भाजपत आणून त्यांना मंत्रिपदे देणे हा एकप्रकारे लाच देण्याचाच प्रकार असल्याची टीका त्यांनी केली. ते नाशिकमध्ये रविवारी (दि.२३) पत्रकार परिषदेत बोलत होते. काँग्रेस सोडून भाजपात गेलेले राधाकृष्ण विखे पाटील व राष्ट्रवादी सोडून शिवसेनेत गेलेले जयदत्त क्षीरसागर यांना मुख्यमंत्र्यांनी दिलेली मंत्रिपदे ही घटनाविरोधी बाब आहे. मुख्यमंत्र्यांच्या या निर्णयाने माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या सरकारने पक्षांतर संदर्भात २००३ मध्ये केलेल्या घटना दुरुस्तीचे उल्लंघन झाले असून, या संदर्भात उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आल्याचे चव्हाण यांनी सांगितले. राज्यात कोणतीही अपवादात्मक परिस्थिती नसताना काँग्रेसमधून भाजपात आलेले विखे व राष्ट्रवादीतून शिवसेनेत आलेले क्षीरसागर यांना मंत्रिपदे देण्यात आली. विशेष म्हणजे पक्षांतर झालेले असताना त्यांना पुन्हा निवडून आल्यानंतर मंत्रिपद देण्याची तरतूद आहे. मात्र सरकारचा कार्यकाळ संपणार असल्याने पोटनिवडणूक होण्याची शक्यता नसताना मुख्यमंत्र्यांनी या दोन मंत्र्यांचा मंत्रिमंडळात समावेश करणे घटनेतील ९१व्या घटना दुरुस्तीच्या दहाव्या परिशिष्टाचे उल्लंघन असल्याचा आरोप करतानाच त्यांना अशाप्रकारे पक्षांतर करून मंत्रिपदे देणे हा लाच देण्याचा प्रकार आहे. हा एक प्रकारचा राजकीय भ्रष्टाचारच असून, तो खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच केल्याचा आरोपही पृथ्वीराज चव्हाण यांनी केला. या प्रकरणी सोमवारी (दि.२४) उच्च न्यायालयात सुनावणी होणार असून, त्यानंतर हे प्रकरण अधिक स्पष्ट होईल, अशी अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्त केली. यावेळी माजी मंत्री डॉ. शोभा बच्छाव, आमदार सुधीर तांबे, जिल्हाध्यक्ष डॉ. तुषार शेवाळे, माजी जिल्हाध्यक्ष राजाराम पानगव्हाणे, शहराध्यक्ष शरद अहेर, नगरसेवक हेमलता पाटील, डॉ. प्रतापराव वाघ आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.आघाडीसोबत चर्चाविधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी होणार असून, सोबत वंचित बहुजन आघाडीला सोबत घेण्यासाठी अॅड. प्रकाश आंबेडकर यांच्याशीही चर्चा सुरू आहे. लोकसभा निवडणुकी-पूर्वी झालेल्या गोष्टींची पुनरावृत्ती होणार नाही, यादृष्टीने प्रयत्न सुरू असल्याचे चव्हाण म्हणाले.
विखे, क्षीरसागर यांना मंत्रिपदे देणे हा तर मुख्यमंत्र्यांचा राजकीय भ्रष्टाचार! : पृथ्वीराज चव्हाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2019 1:13 AM