नाशिक : कायदेशीर नसलेली आणि तपासणीत दोषी असलेली कीटकनाशके विक्रीला कृषी विभागाने हरकत घेतल्यानंतर आता राज्याचे कृषिमंत्री तथा महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनीही शेतकऱ्यांचे नुकसान होणार नाही अशी कारवाई करा, असे आदेश कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले.कृषी क्षेत्राशी निगडीत एका प्रदर्शनात शनिवारी (दि.२८) कृषी अधिकारी, नाडाचे पदाधिकारी व खते व कीटकनाशके विक्रेते यांचे एक चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. त्या चर्चासत्रात उपस्थित राहून कृषिमंत्री व महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी कृषी विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या नवनवीन योजना व निर्णयाची माहिती दिली. परवानगी नसलेल्या व तपासणीत दोषी आढळलेल्या कीटकनाशके विक्रीवर बंदी आणण्याबाबत लवकरच शासन निर्णय घेणार असल्याची कुणकुण विक्रेत्यांमध्ये असल्याने याबाबत या चर्चासत्रात चर्चा होईल, ही अपेक्षा खरी ठरली. तूर्तास शेतकऱ्यांचे नुकसान होणार नाही, अशी कारवाई करा, असे आदेश एकनाथ खडसे यांनी कृषी विभागाला दिल्याची माहिती सूत्रांनी दिली. यावेळी बैठकीस जिल्हा कृषी विकास अधिकारी हेमंत काळे, उपविभागीय तंत्र अधिकारी दीपेंद्र सिसोदिया, उपविभागीय कृषी अधिकारी गोकुळ वाघ, मोहीम अधिकारी राजेंद्र साळुंखे आदिंसह नाडाचे पदाधिकारी व विक्रेते उपस्थित होते. (प्रतिनिधी)
सदोष कीटकनाशक विक्रीवर लवकरच बंदी?
By admin | Published: November 28, 2015 11:20 PM