नाशिक : दिवाळीत अंगणात आकाशकंदील तसेच विजेच्या माळा लावण्यासाठी मूळ वीजजोडणीपासून एक्स्टेन्शन घेतले जाते. घरात अशा प्रकारची जोडणी करताना काळजी घेतली नाही तर विजेचा धक्का लागण्याची शक्यता असते. त्यामुळे वीजजोडणी करताना काळजी घेण्याबरोबरच दर्जेदार विजेची उपकरणे वापरणे कधीही सुरक्षित ठरू शकते. विजेचे काम करताना सुरक्षितता अत्यंत महत्त्वाची असते, परंतु त्यासाठी काय काळजी घ्यावी याची माहिती नसल्यामुळे दुर्घटना घडू शकते. तात्पुरते काम असल्याचे सांगून घरातील मंडळी विजेशी खेळण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे धोका निर्माण होऊ शकतो. अशा प्रकारचे काम करताना अगोदर पुरेशी माहिती जाणून घेणे अपेक्षित आहे. बाजारात चायनीज विजेची उपकरणे मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहेत. विजेच्या माळा, एक्स्टेन्शन बॉक्स, वायर्स आदि वस्तू अगदी हातगाडीवरदेखील उपलब्ध आहेत. या वस्तूंची कोणतीही गॅरंटी नसल्याने अशा वस्तू वापरणे धोक्याचे असते. विजेची जोडणी घेताना आपण कुठे वायरिंग करीत आहोच याची हे जाणून घेतले पाहिजे. घरातील लोखंडी जाळीच्या खिडक्या, गॅलरी, बाल्कनीच्या ग्रीलला विद्युत रोषणाई केली जाते. लक्षात ठेवा, लोखंडी वस्तुंवर विद्युत वायर्स सोडताना त्या कुठेही तुटलेल्या असता कामा नये, तसे असेल तर लोखंडी वस्तूमध्ये विद्युत प्रवाह उतरण्याचा धोका अधिक असतो. दिवाळीत होणारी सजावट आणि रोषणाई यामुळे दुर्दैवी घटना नाकारता येणारी नाही. अशा दुर्घटनेचे प्रमाण कमी असले तरी आपण दक्ष असले पाहिजे.
दिवाळी सुरक्षित साजरी करण्यासाठी महावितरणकडून नेहमीच आवाहन केले जाते. विजेची जोडणी घेताना काळजी घेणे अपेक्षित आहे. घरातील विद्युत जोडणी करताना अर्थिंग व्यवस्थित असल्याची खात्री केली पाहिजे. - सवाईराम, अधीक्षक अभियंता