जायखेडा : बागलाण तालुक्यातील अंबासन गावाच्या पूर्व भागात वनविभागाचे निमधरा आणि सौंदरा अशी दोन जंगले आहेत. हिरवाईने नटलेले हे वनक्षेत्र आजूबाजूने डोंगर दऱ्यांनी वेढलेले आहे. मात्र हिरवाईने बहरलेल्या वनराईकडे वनविभागाने दुर्लक्ष केल्यामुळे ही वनसंपत्ती पूर्णपणे नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. या जंगलांतील वृक्षांवर कुऱ्हाडीचे घाव घालत लाकूडतोड्यांनी निमधरा जंगल पुर्णत: ओसाड करून टाकल्याने, वन्यजीवांचे अस्तित्व धोक्यात आले आहे. वनविभागाचे दुर्लक्ष झाल्याचा आरोप नागरिकांनी केला असून, त्यामुळे वृक्षप्रेमींकडून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.तीन वर्षांपूर्वी वनविभागाने या जंगलात लाखो रुपये खर्च करून दशमूळ योजना राबविली होती. मात्र वनविभागाचे लक्ष नसल्यामुळे ही योजना बारगळली. यामुळे शासनाचा लाखो रुपये खर्च पाण्यात गेला आहे.काही अंशी उरलेल्या सौंदरा जंगलातील हिरव्यागार वृक्षांकडे लाकूडतोड्यांनी आपला मोर्चा वळविल्याने बेसुमार वृक्षतोड होत आहे. वनविभागातील जंगलसंपत्ती नष्ट होण्याच्या मार्गावर असून, वेळीच वनविभागाने लक्ष घालण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. (वार्ताहर)
वनसंपत्तीचा ऱ्हास
By admin | Published: February 12, 2017 10:42 PM