सूर्यकांत पवार
व्हिजन २०३० कडे वाटचाल करायची असेल तर सर्वप्रथम विजेची निर्मिती व उपलब्धतेविषयी जागरूक व आग्रही असणे अत्यावश्यक आहे. कारण ग्राहक व उद्योगांना परवडणाऱ्या दरात मुबलक व अखंड वीज मिळणे आवश्यक आहे. मंत्रभूमी म्हणून प्रसिद्ध असलेल्या नाशिक शहराला यंत्रभूमी म्हणून स्थान प्राप्त करून देण्यात जसा एच.ए.एल., करन्सी नोट प्रेस, रेल्वे ट्रॅक्शन, सातपूर-अंबड-गोंदे येथील औद्योगिक परिसराचा जेवढा वाटा आहे, त्यापेक्षा जास्तच या नगरीच्या औद्योगिक प्रगतीस अत्यावश्यक असलेल्या विजेची निर्मिती करणाºया एकलहरेच्या नाशिक औष्णिक विद्युत केंद्राचा सिंहाचा वाटा आहे, असे म्हटले तर वावगे ठरू नये.लवकरच आपण २०२० मध्ये प्रवेश करीत आहोत. प्रगत व पुरोगामी राज्य म्हणून महाराष्ट्राचा देशात नावलौकिक आहे, अशा राज्याच्या प्रमुख शहरांमध्ये नाशिकचा नावलौकिक आहे. आता आपण वर्ष २०३० चे व्हिजन डोळ्यासमोर ठेवून या शहराच्या सर्वांगीण विकासाचा, प्रगतीचा विचार करणे व त्यानुरूप पावले उचलणे शासनकर्त्यांना, लोकप्रतिनिधींना व प्रशासकीय यंत्रणेला अत्यावश्यक आहे. यामध्ये नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग व सहकार्यसुद्धा अपेक्षित आहे. सन १९७०-७१ मध्ये नाशिक जवळच एकलहरे येथे वीजनिर्मिती करण्यासाठी प्रयत्न करून १४० मेगावॉटचे दोन संच कार्यान्वित केले कालांतराने १९८१ ला शासनाने २१० मेगावॉटचे तीन संच या ठिकाणी कार्यान्वित केले आणि नाशिक नगरीच्या प्रगतीचा आलेख उंचावू लागला. आजमितीस नाशिक औष्णिक वीज केंद्राच्या ९१० मेगावॉट निर्मिती क्षमतेपैकी आता फक्त ६३० मेगावॉटचे तीन संच अस्तित्वात आहेत, तर १४० मेगावॉटचे दोन संच शासन निर्णयाद्वारे जून २०११ ला अवसायनात काढून बंद करण्यात आले आहेत. उर्वरित ६३० मेगावॉट पैकी आजमितीस फक्त २१० मेगावॉट इतकीच वीज निर्माण करण्यात येत आहे. उर्वरित २१० मेगावॉटचे दोन संच केंद्र, राज्य शासन व महाराष्ट्र राज्य विद्युत नियामक आयोगाच्या निरनिराळ्या धोरणांमुळे बंद आहेत. २०२० मध्ये ही स्थिती आहे म्हणजे आपण प्रगती ऐवजी अधोगतीकडे जात आहोत, असे वाटते.