नाशिक : मुक्त विद्यापीठाने यंदा ३० दिवसांत सहा लाख विद्यार्थ्यांचा निकाल जाहीर करून कामकाजात आमूलाग्र बदल केला असतानाच आता विद्यार्थ्यांना विद्यापीठाविषयी सकारात्मक भावना निर्माण व्हावी यासाठी राज्यातील विभागीय केंद्रांवर विद्यार्थ्यांचा पदवीप्रदान सोहळा करण्याचा निर्णय विद्यापीठाने घेतला आहे. यशवंतराव चव्हाण महाराष्टÑ मुक्त विद्यापीठाने परीक्षा पद्धती, मूल्यांकन आणि निकालाच्या बाबतीत वेगाने बदल करून विद्यार्थ्यांच्या तक्रारी कमी करण्याचा प्रयत्न केला आहे. परीक्षा यंत्रणेनेतील दोष आणि निकालातील विलंब दूर करण्यासाठी यंदा विद्यापीठाने अनेक बदल केले आणि त्याचाच लाभ म्हणजे उत्तरपत्रिकांचे स्कॅनिंग, केंद्रीय मूल्यांकन पद्धतीचा अवलंब यामुळे ३० दिवसांत सहा लाख विद्यार्थ्यांचे निकाल जाहीर करण्यात आले. निकालात एकीकडे गतिमानता आली असताना त्यांना विद्यापीठाशी जोडून घेण्यासाठी विद्यापीठाने आणखी एक पाऊल पुढे टाकले आहे. विद्यापीठात दरवर्षी पदवीप्रदान सोहळा केला जातो. यासाठी राज्यातील विविध भागांतील विद्यार्थ्यांना हजारो किलोमीटरचा प्रवास करून विद्यापीठाच्या सोहळ्याला उपस्थित राहावे लागते. हा सोहळा म्हणजे विद्यापीठ आणि विद्यार्थी यांच्यातील कृतज्ञता सोहळा असतो. परंतु या सोहळ्याला सर्वच विद्यार्थी उपस्थित राहू शकत नसल्याने विद्यापीठाने आता विभागीय केंद्रांनादेखील पदवीप्रदान सोहळा कार्यक्रम करण्याची सूचना केली आहे. मुक्त विद्यापीठाचे अमरावती, औरंगाबाद, मुंंबई, नागपूर, नाशिक, पुणे, कोल्हापूर आणि नांदेड येथे विभागीय केंद्रे आहेत. नऊ विद्याशाखांमध्ये लाखो विद्यार्थी या केंद्रांमधून परीक्षा देऊन उत्तीर्ण होत आहेत. या विद्यार्थ्यांना विद्यापीठाशी जोडून घेण्यासाठी किंबहूना त्यांच्यात विद्यापीठाविषयी आदराची भावना निर्माण करण्यासाठी पदवीप्रदान सोहळाच विभागीय केंद्रांवर घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
‘मुक्त’च्या उपकेंद्रांमध्येही होणार पदवीप्रदान सोहळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 07, 2018 1:24 AM