चांदवड : येथील नेमिनाथ जैन ब्रह्मचर्याश्रम संस्थेत पदवीग्रहण कार्यक्रम नुकताच संपन्न झाला. अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष बेबीलाल संचेती होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून पुणे विद्यापीठाचे परीक्षा नियंत्रक डॉ. अशोक चव्हाण, संदीप विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू डॉ. राजेंद्र तातेड, संस्थेचे मानद सचिव जवाहरलाल आबड उपस्थित होते. यावेळी बोलताना डॉ. राजेंद्र तातेड यांनी पदवी प्राप्त करणे ही यशाची पहिली पायरी असल्याचे सांगितले. पदवीनंतरच्या स्पर्धेला सामोरे जाण्यासाठी विद्यार्थ्यांनी सर्वात्कृष्ठतेचा ध्यास धरावा, मूल्ये, संस्कार व परिश्रम हा आपल्या जीवनाचा पाया असावा, ज्ञान, कौशल्ये व दृष्टिकोन ही यशाची त्रिसूत्री आहे, असे विचार त्यांनी मांडले. यावेळी डॉ. अशोक चव्हाण यांनी संस्थेच्या संस्कारक्षम वातावरणाचे कौतुक केले. विद्यार्थ्यांनी गुणवत्तेवर लक्ष केंद्रित करावे, जैव तंत्रज्ञानासारख्या क्षेत्रामध्ये विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणावर संधी आहेत. तंत्रज्ञानातून मानवी जीवनातील प्रश्न सोडविण्यासाठी संशोधनवृत्ती जोपासणे आवश्यक असल्याचे मत त्यांनी मांडले. ज्ञान, संस्कार व जबाबदारी यांचा समन्वय विद्यार्थ्यांना यशस्वी करतो, असेही चव्हाण म्हणाले. अध्यक्ष बेबीलाल संचेती यांनी पदवीप्राप्त विद्यार्थ्यांचे व अध्यापक वर्गाचे स्वागत केले व संस्थेचा नावलौकिक वाढविण्यासाठी विद्यार्थ्यांनी यशाची अनेक शिखरं गाठावी, असे आवाहन केले. सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन डॉ. एस. डी. संचेती यांनी केले. पाहुण्याचा परिचय डॉ. अरविंद पाटील, डॉ. व्ही. एस. गुळेचा यांनी करून दिला. यावेळी प्राचार्य डॉ. जी. एच. जैन, प्राचार्य डॉ. सी. डी. उपासणी, प्राचार्य डॉ. एम. डी. कोकाटे व पदवीधर विद्यार्थी यांसह शिक्षक, प्राध्यापक उपस्थित होते. (वार्ताहर)
जैन ब्रह्मचर्याश्रमात पदवीग्रहण
By admin | Published: February 14, 2017 12:06 AM