कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे मागील वर्षी पुणे विद्यापीठाने केवळ अंतिम वर्षाच्या परीक्षा घेतल्या हाेत्या. परंतु, ऑक्टाेबर-नाेव्हेंबर २०२० सत्रातील नियोजित एप्रिल-मे २०२१ परीक्षांमध्ये पदवीच्या अंतिम परीक्षांसह पदवीपूर्व प्रथम व द्वितीय वर्षातील विद्यार्थ्यांना सहभागी करून घेतले जाणार आहे. विद्यार्थ्यांना मोबाइल, टॅबलेट, लॅपटॉप, संगणक यांसारख्या गॅझेटद्वारे ही परीक्षा देता येणार असून, संबंधित परीक्षांचे वेळापत्रक विद्यापीठाच्या संकेतस्थळावर टप्प्याटप्प्याने प्रसिद्ध केले जात आहे. विद्यार्थ्यांना एसएमएस, ई-मेलद्वारे माहिती कळविण्यात येत आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांची नोंदणीकृत ई-मेल आयडी व मोबाइल क्रमांक कार्यान्वित असणे आवश्यक आहे.
इन्फो-१
अडसर दूर करण्यासाठी सराव परीक्षा
विद्यार्थ्यांना ऑनलाइन परीक्षेची संपूर्ण माहिती होऊन कोणत्याही अडथळ्याशिवाय परीक्षा देता यावी, यासाठी परीक्षेमधील नमुना प्रश्नांवर आधारित सराव परीक्षा विद्यापीठाकडून घेण्यात येत आहे. मुख्य परीक्षेपूर्वी सोमवारपासून (दि. ५) शुक्रवारपर्यंत (दि. ९) सकाळी दहा ते दुपारी तीन या वेळेत ही सराव परीक्षा घेण्यात येत आहे.
इन्फो-२
परीक्षेनंतर ४८ तासांत गुण होणार उपलब्ध
विद्यापीठाच्या नियोजित वेळापत्रकानुसार परीक्षा झाल्यानंतर विद्यार्थ्यांना सर्व विषयांत मिळालेले गुण परीक्षेनंतर ४८ तासांत स्टुडंट प्रोफाइल सिस्टिममध्ये उपलब्ध केले जातील. त्यानंतर विद्यार्थ्यांना पुढील ४८ तासांत अडचणी किंवा शंका असल्यास यासंदर्भात तक्रार नोंदवण्याची संधी दिली जाईल. या परीक्षेसाठी आवश्यक माहिती मिळविण्यासाठी विद्यार्थ्यांनी विद्यापीठाच्या संकेतस्थळाचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले असून, परीक्षांबाबत सूचना, उपयोगकर्ता पुस्तिका, व्हिडिओ याच संकेतस्थळावर उपलब्ध होणार आहेत.