पुंडलिकराव थेटेवारकरी हा पंढरीला जाण्यासाठी आषाढी वारीची वर्षभर वाट पाहतो. वास्तविक पाहता आषाढी वारीप्रमाणेच कार्तिकी, माघी, चैत्री वारीचेदेखील महत्त्व आहे. त्याचबरोबर अन्य सण-उत्सवाला वारकरी पांडुरंगाच्या दर्शनासाठी जात असतो. त्यामुळे या तीर्थक्षेत्री नेहमीच गर्दी असते; परंतु आषाढी वारीची लाखो वारकऱ्यांची पंढरपुरात होणारी मांदीयाळी ही अलौकिक म्हणावी लागेल.वारकºयांप्रमाणेच मीदेखील नियमित वारीला जातो. माझे वडील भाऊराव थेटे हे वारकरी होते. ते नियमित वारीला जात असत. त्यांच्या निधनानंतर मीदेखील आमच्या पंचवटीतील श्रीराम वारकरी मंडळाच्या माध्यमातून वारीला जाऊ लागलो. या काळात वारकºयांचे जीवन मला जवळून बघता आले. त्यानंतरच्या काळात श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर येथील संत निवृत्तिनाथ देवस्थान ट्रस्टचा विश्वस्त म्हणून काम करीत असताना वारकºयांची सेवा करण्याचे कार्य घडले.संत निवृत्तिनाथ पालखीचा सात मानाच्या पालख्यांमध्ये समावेश असतो. त्यामुळे साहजिक संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम महाराजांच्या पालख्यांप्रमाणे आमच्या पालख्यांमधील सहभागी दिंडी आणि वारकºयांची संख्या मोठी असते. त्यातच लांबचा प्रवास असल्याने मुक्कामी ठिकाणेही जास्त असतात. याठिकाणी वारकºयांना पिण्याच्या पाण्याचे टॅँकर उपलब्ध करून देणे, रुग्णवाहिकेची व्यवस्था करणे, डॉक्टर व औषधी तसेच अन्य साधनसामग्रीची व्यवस्था करण्यासाठी आम्ही ट्रस्टमार्फत प्रयत्न करतो या कार्यासाठी हजारो ‘दात्यांचे’ हात पुढे येतात; परंतु यासाठी महिनाभरापासून जुळवाजुळव करावी लागते. याठिकाणी काही वेळा कमतरता असते; परंतु वारकरी कशाचीही पर्वा न करता पायी चालत राहतात. पांडुरंगाचे दर्शन घडावे हाच त्यांचा दृढ निश्चय असतो. यावारीत अनेक ज्येष्ठ नागरिक असतात. चालताना चिखल, पाऊस यामुळे चपला तुटतात तरीही अनवाणी पायांनी मुखी हरिनामाचा गजर करीत दिंड्या पुढे जात असतात.भगव्या पताका खांद्यावरी घेऊन ‘पांडुरंग हरी ज्ञानोबा माउली तुकाराम’ असा जयघोष सुरू असतो. मुक्कामाच्या ठिकाणी जे काही मिळेल ते खाऊन सकाळी पहाटे उठून पुन्हा वारीत सहभागी होतात. दररोजचा दिनक्रम ठरलेला असतो. येथे लौकिक संसाराचे भान राहत नाही, अलौकिक सुखाचा मार्ग समोर दिसत असतो. ‘देह जावो अथवा राहो, पांडुरंगी लीन होवो’असा दृढभाव येथे असतो.(लेखक, संत निवृत्तिनाथसंस्थानचे विश्वस्त)
‘देह जावो अथवा राहो, पांडुरंगी लीन होवो’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2018 1:41 AM