लोकमत न्यूज नेटवर्कसायखेडा : शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देण्यात यावी यासाठी सलग आठ दिवस राज्यातील शेतकऱ्यांनी संप पुकारला होता, मात्र राज्यातील बहुतांशी शेतकरी हे मध्यभूधारक असल्याने सरसकट कर्जमाफी व्हायला हवी. मंत्रिगटाच्या बैठकीत घेण्यात आलेला सरसकट कर्जमाफीचा निर्णय झाला असला तरी त्यातील निकष आणि अटी पहाता राज्यातील केवळ दहा टक्के शेतकऱ्यांना कर्जमाफी होईल, अशी चर्चा शेतकऱ्यांमध्ये सुरू असून, या संदर्भात अनेक पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत असल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संभ्रम कायम आहे. कर्जमाफीला अवधी असल्याने शेतकऱ्यांना दहा हजार रुपये अग्रीम देण्याचे आदेश शासनाने दिला असला तरी त्याचे निकष पहाता दहा हजार रुपये नको आणि कर्जमाफीलादेखील हेच निकष रहातील, असा अंदाज शेतकरी बांधत आहे. अशा अटी आणि निकष असल्यास शेतकरी कर्जमाफी देताच कशाला अशा संतप्त प्रतिक्रि या व्यक्त होत आहे. आमदार, खासदार, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, नगरसेवक या राजकीय नेत्यांना कर्जमाफी नसली तरी चालेल; मात्र सरकारी कर्मचारी असल्यास कर्जमाफी नाही, कुटुंबातील एखादा व्यक्ती सरकारी नोकरी करत असल्याससुद्धा कर्जमाफी नाही तसेच नोंदणीकृत व्यवसाय असल्यास कर्जमाफी नाही याशिवाय चारचाकी गाडी असल्यासदेखील कर्जमाफी नाही, असे अनेक किचकट आणि वाटेल ते निकष लावून कर्जमाफी सरकार देणार असेल तर किती शेतकऱ्यांना दिलासा मिळणार हा संशोधनाचा विषय आहे.शेतीवरील कर्ज माफ केले पाहिजे. सरकारी नोकरी असो किंवा घरातील एखादा माणूस नोकरी करत असेल तर त्याचे कुटुंब चालत असेल मात्र शेती त्यांचीही तोट्यातच गेली आहे. चारचाकी गाडी कर्ज काढून घेतली असली तरी त्याचे कर्ज फेडण्यासाठी सरकारकडे शेतकरी कर्जमाफी मागत नाही तर शेतीवरील कर्ज फेडू शकत नाही त्यामुळे कर्जमाफी हवी आहे.सातबारा उताऱ्यासाठी शेतकऱ्यांची गर्दीसायगाव : शासनाने कर्जमाफीचा निर्णय जाहीर केल्यानंतर सायगावसह परिसरातील शेतकऱ्यांनी आनंद व्यक्त केला आहे. सायगाव येथील वि.का. सहकारी सोसायटीने कर्जदार सभासदांकडून सातबारा उतारा व आधारकार्ड या कागदपत्राची मागणी केल्याने सातबारा उतारा घेण्यासाठी परिसरातील धामणगाव, पांजरवाडी व सायगाव येथील शेतकऱ्यांनी दोन तीन दिवसापासून सायगाव येथील शेतकऱ्यांनी तलाठी कार्यालयात गर्दी केली. आता सर्वांनाच कर्जमाफी मिळेल या आशेवर शेतकरी असून, शासनाने कोणतेही निकष न वापरता कर्ज बाजारी शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यावी, अशी मागणी सरपंच योगीता भालेराव यांनी एका निवेदनाद्वारे केली आहे.
कर्जमाफीनंतर संभ्रम कायम
By admin | Published: June 17, 2017 12:05 AM