नाशिक : जिल्हा परिषद व पंचायत समितीस्तरावर काम करताना सुशिक्षित बेरोजगार कंत्राटदार अभियंत्यांना निविदा वेळेवर न देणे व बिले मिळण्यास होणारी दिरंगाई अशा अनेक अडचणींचा सामना करावा लागत असून, त्याचा थेट परिणाम विकासकामांवर होत आहे. त्यामुळे जिल्हा परिषद प्रशासनाने या प्रकरणी गांभीर्याने लक्ष देऊन अभियंत्यांच्या अडचणी सोडविण्यात याव्या, अशी मागणी महाराष्ट्र इंजिनियर्स असोसिएशन संलग्न सुशिक्षित बेरोजगार अभियंता संघटनेने केली आहे. सुशिक्षित बेरोजगार अभियंता संघटनेचे आर. टी. शिंदे, शशिकांत आव्हाड यांच्या नेतृत्वाखालील अभियंत्यांच्या शिष्टमंडळाने सोमवारी (दि.१७) जिल्हा परिषद अध्यक्ष सांगळे व मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी कंत्राटदार अभियंत्यांना येणाऱ्या अडचणींच्या तक्रारींचा पाढा वाचतानाच निविदा वेळेवर होत नसल्याने व नियोजित वेळेत बिले निघत नसल्याने कामकाजावर परिणाम होत असल्याची बाब निदर्शनास आणून दिली. तसेच कामांचे अंदाजपत्रक बनविताना प्रत्यक्ष पाहणी करून ते बनवावे, नैसर्गिक वाळूचे लिलाव जेथे झाले तेथील लीड ग्राह्ण धरावा, अंदाजपत्रकापेक्षा जास्त काम करून घेऊ नये, एकाच तालुक्यात किंवा गावात एकसारख्या कामासाठी लागणारे साहित्याचे दर एकसारखे असावे, काम पूर्ण झाल्यावर त्वरित बिल काढण्यात यावे, धावते देयक देऊ नये, उपविभागात बिल सादर झाल्यावर त्यास टोकन द्यावे, बिल तपासणीतील त्रुटींचा स्पष्ट उल्लेख असावा, अनामत रक्कम तत्काळ मिळावी आदी मागण्याही शिष्टमंडळाने केल्या. यावेळी संजय गायकवाड, रामनाथ सांगळे, हर्षल काळे, सतीश टोली, जय आव्हाड, चंद्रशेखर डांगे, अजित सकाळे, अनिल दराडे, निसर्गराज सोनवणे, संदीप वाजे, विजय गायकवाड आदी उपस्थित होते.
बिलांमध्ये दिरंगाई; कामांवर परिणाम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2018 1:58 AM