नाशिक : शिक्षकदिनी दरवर्षी जिल्हा परिषदेच्या वतीने दिल्या जाणाऱ्या आदर्श शिक्षक पुरस्काराला यंदा कोरोनामुळे ग्रहण लागले असून, शिक्षकांचे या पुरस्कारासाठी प्रस्ताव प्राप्त झाले असले तरी, त्यासाठी दरवर्षीप्रमाणेच होणारी वशिलेबाजी व राजकीय दबावामुळे यंदा आदर्श शिक्षकांची निवड करण्यातही जिल्हा परिषदेच्या अध्यक्षांना अडचणी निर्माण झाल्या आहेत. मात्र असे असले तरी, या पुरस्कार सोहळ्यासाठी शिक्षण विभागाकडून केल्या जाणाºया खर्चाला वित्त विभागाने नोंदविलेला आक्षेप व पुरस्कार सोहळ्यातील गर्दी टाळण्यासाठी तूर्त पुरस्कार वितरण स्थगित करण्याचा निर्णय जिल्हा परिषदेला घ्यावा लागला आहे.गेल्या अनेक वर्षांपासून जिल्हा परिषदेच्या वतीने दरवर्षी ५ सप्टेंबर रोजी जिल्हा परिषदेच्या शाळेत उत्कृष्ट कार्य करणाºया शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्कार देण्याची प्रथा आहे. त्यासाठी प्रत्येक तालुक्यातील एक याप्रमाणे पंधरा शिक्षकांची निवड केली जाते.मात्र त्यासाठी प्रत्येक तालुक्यातील शिक्षकांना प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन प्रशासनाकडून केले जाते. आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी शिक्षकाचे योगदान, त्याने आजवर केलेले उल्लेखनीय कार्य व विद्यादानासाठी त्याचा झालेला उपयोग यावर त्याचे गुणांकन ठरविण्याचा निकष प्रशासकीय पातळीवर असला तरी, प्रत्यक्षात मात्र हा पुरस्कार शिक्षकांमध्ये राजकीय लॉबिंग करूनच पटकाविण्याची पद्धत रुढ झाली आहे व त्याला तालुका, जिल्हा पातळीवरील लोकप्रतिनिधी, जिल्हा परिषदेचे पदाधिकारी, सदस्यांचे पाठबळ मिळत आले आहे.जिल्ह्यातील पंधराही तालुक्यांतून आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी प्रस्ताव प्राप्त झालेले असले तरी, इगतपुरी तालुक्यातील पुरस्कारासाठी मंत्री, आमदार, जिल्हा परिषद सदस्यांनी प्रशासन, जिल्हा परिषद अध्यक्षांवर राजकीय दबाव टाकल्यामुळे पुरस्कारार्थींची निवड होऊ शकली नसल्याची चर्चा होत आहे. एका पुरस्कारासाठी होत असलेली राजकीय खेचाखेची पाहता, जिल्हा परिषद अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर यांनी पुरस्कारांसाठी प्राप्त प्रस्तावांची छाननी करणे तसेच त्याची वास्तविकता तपासणी करण्याचे निमित्त पुढे करून आदर्श शिक्षक पुरस्कार निवडीची प्रक्रिया स्थगित केल्याचे सांगण्यात येत आहे.
कोरोनामुळे आदर्श शिक्षक पुरस्काराला खोडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 05, 2020 12:37 AM