भास्कर सोनवणे, नाशिक : आपल्याला राजधानी दिल्लीला प्रजासत्ताक दिनाच्या विशेष कार्यक्र माला केंद्र सरकारने विशेष आग्रहाचे निमंत्रण दिलं आहे, असं कुणी तुम्हाला ऐकवलं तर आपण स्वप्नात तर नाही ना, हे तपासून घेतले जाईल. परंतु, स्वप्नवत वाटणारे हे निमंत्रण ध्यानीमनी नसतांना इगतपुरी तालुक्यातील आशाकिरणवाडी येथील सोमनाथ जोशी यांना सपत्निक मिळाले आहे. दहा वर्षांपूर्वी तत्कालीन राष्ट्रपती डॉ. अब्दुल कलाम यांनी भेट देऊन आशाकिरणवाडी नामकरण केलेल्या वैतागवाडीचे हे जोडपे आहे.प्रजासत्ताक दिन कार्यक्र मासाठी केंद्र सरकारचे विशेष पाहुणे म्हणून महाराष्ट्रातून सोमनाथ जोशी आणि गडचिरोली जिल्ह्याच्या अहेरी येथील सौ. वांजे हुंगा तळवंडी यांची निवड करण्यात आलेली आहे. त्यांच्यासाठी विशेष संपर्कअधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली असून त्यांना प्रजासत्ताक दिनाच्या काही दिवस आधी राजेशाही थाटात दिल्ली दर्शन घडवण्यात येणार आहे. राज्याच्या आदिवासी विकास विभागाकडून केंद्राला प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमासाठी निमंत्रितांच्या नावाचा प्रस्ताव सादर करण्यात आला होता. त्यात राज्यातील जोशी यांचा समावेश झाला असून त्यांना केंद्र सरकारने विशेष निमंत्रण पाठवले आहे. सोमनाथ जोशी इगतपुरी पंचायत समितीच्या नांदगाव बुद्रुक गणातून पंचायत समिती सदस्य म्हणून काँग्रेसच्या तिकिटावर निवडून आलेले आहेत. दहा वर्षांपूर्वी तत्कालीन राष्ट्रपती डॉ. अब्दुल कलाम यांनी इगतपुरी तालुक्यातील वैतागवाडी या आदिवासी वाडीची प्रगती पाहण्यासाठी भेट दिली होती. त्यावेळी जोशी यांच्या परिवारात डॉ. कलाम रमले होते. आदिवासी कुटुंबाच्या व्यथा त्यांनी समजून घेतल्या होत्या.
वैतागवाडीचे कुटुंब ठरले दिल्लीचे विशेष पाहुणे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2019 4:10 PM
बहुमान : प्रजासत्ताक दिनाचे केंद्र सरकारकडून निमंत्रण
ठळक मुद्देप्रजासत्ताक दिनाच्या काही दिवस आधी राजेशाही थाटात दिल्ली दर्शन घडवण्यात येणार आहे