---
नाशिक : पूर्व-पश्चिम वनविभागाच्या हद्दीत ज्या गावांच्या परिसरात पर्यावरण व जैवविविधता टिकून आहे, अशा गावांचे क्षेत्र निश्चित करत ‘इको सेन्सिटिव्ह झोन’चे (पर्यावरणीय संवेदनशील क्षेत्र) सीमांकन करणे अत्यावश्यक आहे, तरच जिल्ह्यातील निसर्ग अन् जैवविविधतेला संरक्षण प्राप्त होईल. त्र्यंबकेश्वरमधील ब्रह्मगिरी पर्वताचा परिसर हा राखीव वनक्षेत्र म्हणून घोषित करण्यात आलेला आहे.
वनक्षेत्रात कुठल्याहीप्रकारे उत्खनन किंवा अन्य कोणतेही अवैध स्वरूपाच्या हालचाली सुरू नाही, त्यामुळे वनक्षेत्राला धाेका निर्माण होण्याचा प्रश्नच येत नाही. ज्या गटक्रमांकात विकासकाकडून महिनाभरापूर्वी सपाटीकरणासाठी उत्खनन करण्यात आले, तेदेखील मालकी क्षेत्र असल्याचा निष्कर्ष वनविभागाने सर्व कागदपत्रांची तपासणीअंती काढला आहे. येथील मालकी क्षेत्राच्या परिसरात ज्या पद्धतीने खोदकाम करण्यात आले, ते अत्यंत चुकीचेच आहे, कारण जवळच वनक्षेत्र अस्तित्वात आहे.
बेळगाव ढगा येथील सांतोषा-भागडी डोंगराला लागून पाठीमागील बाजूने मौजे सारूळ शिवारातील खानपट्ट्यांची पाहणी प्रत्यक्षरीत्या भेट देऊन केली आहे. या ठिकाणी सुमारे ३४ खानपट्टे (स्टोन क्रशर) सुरू आहेत. यास महसूल विभागाकडून अटी-शर्तींवर परवानगी देण्यात आली आहे. दरम्यान, सारूळ शिवारात होणारे उत्खनन आणि त्यासाठी केल्या जाणाऱ्या ब्लास्टिंगमुळे ‘सांतोषा-भागडी’च्या नैसर्गिक जैवविविधतेला धोका निर्माण झाला आहे. येथील वन्यजिवांसाठीदेखील हा अधिवास आता असुरक्षित बनू लागला आहे. येथील नऊ खानपट्टेधारकांना वनविभागाने प्रतिबंधात्मक कारवाईची नोटीस बजावली आहे. कारण या खानपट्टेधारकांनी उत्खनन करताना वनहद्दीपासून १५ मीटर (४५ ते ५० फुट) लांबच राहणे कायद्याने बंधनकारक आहे; मात्र त्यांनी या अटीचा भंग करत वनहद्दीच्या १५ मीटरपेक्षा कमी अंतरावर येऊन उत्खनन केल्याचे सर्वेक्षणात स्पष्ट झाले आहे. त्यामुळे पुढील कारवाईसाठी याबाबतचा सविस्तर अहवाल जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठविण्यात आला आहे. कडक कारवाई करण्यात यावी, अशी शिफारसदेखील त्याद्वारे केली आहे. गंगाद्वार क्षेत्रात डोंगरावरील काही दगड कोसळण्याची घडलेली घटना ही नैसर्गिक स्वरूपाची आहे, त्यामुळे अफवांवर कोणीही विश्वास ठेवू नये आणि याबाबत अफवाही पसरवू नये, एवढेच मी सांगू इच्छितो.
-पंकज गर्ग, उपवनसंरक्षक, नाशिक पश्चिम वनविभाग