नाशिक : सिंहस्थ कुंभमेळा काळात नाशिक शहरात भाविकांची गर्दी वाढत असून, पर्वणीकाळात गर्दीचा उच्चांक होणार आहे. त्यावेळी अनेक लहान मुले, वृद्ध माणसे आणि भाविक वाट चुकून आपल्या नातेवाइकांपासून दूर जातात. त्यामुळे अशा गर्दीत वाट चुकलेल्या भाविकांना दिलासा देण्याचे कार्य कोलकाता येथील प्रणव कन्या संघाच्या महिला कार्यकर्त्या करणार आहेत. औरंगाबाद-टाकळी लिंकरोडवरील पोलीस चौकी नजीकच कोलकाता येथील प्रणव कन्या संघ या सेवाभावी महिला संघटनेचा तंबू असून, या ठिकाणी सुमारे ७५ भगिनी वाट चुकलेल्या आणि हरवलेल्या भाविकांना दिलासा देणार आहेत.या कार्यासाठी मिळालेल्या जागेची संघाच्या प्रमुख कार्यकर्त्या ब्रह्मचारिणी देवी आणि ब्रह्मचारिणी दीपानीता देवी यांच्यासह काही कार्यकर्त्यांनी पाहणी करून येथील कामाची माहिती घेतली. प्रत्येक कुंभमेळ्यात संघाच्या वतीने हा उपक्रम राबविण्यात येतो. विशेष म्हणजे ज्या लोकांकडे परतीच्या प्रवासासाठी पुरेसे पैसे नसतात त्यांना पैसे तसेच शिधा देऊन घरी परत जाण्याची व्यवस्था करण्यात येते. मुख्य म्हणजे हरवलेल्या मुलांना किंवा वृद्ध माणसांना प्रथम धीर देऊन पोलिसांच्या मदतीने त्यांच्या घरच्या लोकांशी संपर्क साधला जातो. त्यानंतर त्यांची योग्य ती काळजी घेऊन परतीच्या मार्गाची सोय केली जाते. गर्दीत कुणाला दुखापत झाल्यावर त्यावर उपचार करण्याची व्यवस्थाही संघातर्फे करण्यात आली आहे. (प्रतिनिधी)
गर्दीत चुकलेल्या भाविकांना देणार दिलासा
By admin | Published: August 04, 2015 10:53 PM