नाशिक : कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीला कोरोना झाल्यानंतर जर ती व्यक्ती रुग्णालयात ॲडमिट असेल, तर त्या बाधिताला तिथे मिळणारे अन्न खाऊ द्यावे. दिवसातून दोनदा डबे पाेहोचवण्याचे काम करणारे त्या घरांमधील तरुण बाधित होत असल्याचे निदर्शनास येत आहे.
आपल्या कुटुंबातील बाधिताची काळजी घेणे आवश्यकच आहे. मात्र डबा पोहोचवायचाच असेल तर तो यूज ॲण्ड थ्रो प्रकारातील वापरावा तसेच तो डबा गेटवरच देऊन माघारी जाणे आवश्यक आहे. किंवा त्या रुग्णालयात जे अन्न मिळत असेल, त्यावर आठ दिवस काढणे काही गैर नाही. त्यातून रुग्णाच्या कुटुंबातील अन्य व्यक्ती बाधित होण्याची शक्यता संपुष्टात येते. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत संपूर्णच्या संपूर्ण कुटुंबच बाधित होण्याचे प्रमाण खूप वाढलेले आहे. अशा परिस्थितीत रुग्णांनीदेखील आपल्यामुळे कुटुंबातील इतरांना लागण होऊ नये, याबाबत दक्षता बाळगणे अत्यंत गरजेचे असते. त्यामुळे घरात विलगीकरणात असलेल्यांनी तर कोणत्याही परिस्थितीत किमान पंधरा दिवस त्या बंदिस्त खोलीतून बाहेर पडू नये. तसेच कुटुंबातील विलगीकरणातील व्यक्तीला अन्न, पाणीदेखील डिसपोझेबल प्रकारातील भांड्यांमधून दिल्यास त्यातूनही कोरोनाचा प्रसार रोखण्यास आपसूकच मदत मिळते. त्यामुळे कोरोनाबाधित आणि कुटुंबीय किती दक्ष राहतात, त्यावरच कोरोनाचा प्रसार रोखणे शक्य होते.
डॉ. आवेश पलोड, मनपा नोडल अधिकारी