नाशिक : शहर व जिल्ह्यातील विविध कनिष्ठ महाविद्यालये सोमवारपासून (दि. ४) सुरू झाली आहेत. मात्र अजूनही अनेक विद्यार्थी प्रवेशापासून वंचित आहेत. अशा विद्यार्थ्यांसाठी त्यांच्या जवळच्या भागातील उच्च माध्यमिक विद्यालये व कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये दहा टक्के जागा वाढवून देण्याची मागणी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेतर्फे करण्यात आली आहे.
कोरोनामुळे शैक्षणिक वर्षाचा मोठा कालावधी वाया गेला असून प्रवेश प्रक्रियेलाही विलंब झाल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होण्याची भीती निर्माण झाली आहे. शहरालगत असणाऱ्या ग्रामीण भागातील अनेक विद्यार्थ्यांना अजून अकरावीत प्रवेश मिळालेला नाही. जवळच्या कनिष्ठ महाविद्यालयांच्या अनुदानित जागांचा कोटा पूर्ण झाला असून ग्रामीण भागातील अनेक विद्यार्थी प्रवेशापासून वंचित आहे. या विद्यार्थ्यांसाठी परिसरातील कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये १० टक्के जागा वाढवून देण्याची मागणी मनविसेतर्फे करण्यात आली आहे. दरम्यान, या संदर्भात शिक्षण उपसंचालक कार्यालयाने शिक्षण संचालक कार्यालयाला प्रस्तावही सादर केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. यावेळी मनविसे जिल्हाध्यक्ष श्याम गोहाड, शहराध्यक्ष संदेश जगताप व ललित वाघ, सरचिटणीस प्रशांत बारगळ, अभिषेक सोनार, आदित्य कुलकर्णी, राहुल बोराडे, विशाल चौधरी आदी पदाधिकारी उपस्थित होते.