नाशिक : पिंपरी-चिंचवड येथील एका खून प्रकारणात समाजात तेढ निर्माण करू पाहणाऱ्या आणि समाजातील महिला व मुलींविषयी आक्षेपार्ह टिप्पणी करणाऱ्या समाजकंटकांविरोधात गुन्हा दाखल करून सायबर क्राइम शाखेमार्फत चौकशी करून कारवाई करण्याची मागणी मराठा सेवक समितीच्या सदस्याने सोमवारी (दि.१५) जिल्हाधिकारी कार्यालयात दिलेल्या निवेदनाच्या माध्यमातून केली आहे.
सध्या राज्यातील गाजत असलेल्या पिंपरी-चिंचवड येथील खून प्रकरणात दोषी असणाऱ्या आरोपींना शासन व्हावे, यासाठी मराठा समाजातील कोणीही कसल्याही प्रकारचा विरोध केलेला नाही. या घटनेचा मराठा क्रांती मोर्चा निषेध करीत असून, सदर प्रकरणात कायदेशीर प्रक्रिया चालू असताना काही समाजकंटक या घटनेच्या आधारे समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप नाशिकमधील मराठा सेवक समितीने केला असून, अशाप्रकारे समाजात तेढ निर्माण करणारांवर समाजकंटकांच्यावर कारवाई करण्याची मागणी मराठा क्रांती मोर्चा वतीने अपर जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनाच्या माध्यमातून करण्यात आली आहे. यावेळी मराठा सेवक समितीचे करण गायकर, राजू देसले, गणेश कदम, अमित जाधव, शरद तुंगार, सचिन कोकणे, पूजा धुमाळ, महेश व्यवहारे, सागर कोचर, गणेश दळवी आदी उपस्थित होते.