फिरत्या विक्रेत्यांची संख्या झाली कमी
नाशिक : राज्य शासनाने कठोर निर्बंध लागू केल्यामुळे फिरत्या भाजीविक्रेत्यांची संख्या कमी झाली असल्याचे दिसून येत आहे. बाजार समितीमध्येही किरकोळ विक्रेत्यांना बंदी केली असल्याने त्यांना माल मिळण्यासही अडचणी येत आहेत इतरवेळी परिसरात अनेक भाजीविक्रेते दिसतात सध्या मात्र महिलांना आपल्या परिसरात भाजीविक्रेता येण्याची वाट पहावी लागत आहे.
मनपाला फलक लावण्याचा विसर
नाशिक : शहरातील अनेक परिसरांत मोठ्या प्रमाणात रुग्ण वाढल्याने नागरिकांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे. अनेक घरांमध्ये रुग्ण असले तरी महापालिकेच्या वतीने कोठेही निषिद्ध क्षेत्राचा फलक लावलेला नाही यामुळे अनेकांची दिशाभूल होते. मागीलवर्षी मनपातर्फे रुग्ण सापडल्यानंतर लगेच त्या ठिकाणी फलक लावले जात होते. यावर्षी मात्र मनपाला या कामाचा विसर पडला आहे.
भुरट्या चोरांवर कारवाईची मागणी
नाशिक : लॉकडाउनच्या काळातही शहरात भुरट्या चोऱ्यांचे प्रमाण कमी झालेले नाही यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. पोलिसांचे या चोरांकडे दुर्लक्ष होत असल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे. किरकोळ चोऱ्यांची पोलिसांत नोंदही केली जात नसल्याने या चाेरांचे फावते याबाबत कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे.
मशागतीच्या कामांना वेग
नाशिक : ग्रामीण भागात शेतीच्या मशागतीच्या कामांना वेग आला असून, नांगरणी आणि इतर कामे उरकण्यात शेतकरी व्यस्त आहेत. यावर्षी ट्रॅक्टरचालकांनी नांगरणीचे दर वाढविले असल्याने अनेकांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. वाढत्या उन्हामुळे अनेक शेतकरी दुपारच्या आतच कामे उरकत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.
वस्तूंची कृत्रिम टंचाई
नाशिक : कोरोनामुळे अनेक वस्तूंची कृत्रिम टंचाई निर्माण केली जात असून, अनेक विक्रेते या वस्तूंची अवाच्या सवा दराने विक्री करीत आहेत यामुळे नागरिकांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. अशा विक्रेत्यांना कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे.