उमराणे : पावसाळ्याचे तीन महीने उलटत आले तरी देवळा तालुक्यात समाधानकारक पाऊस न झाल्याने शेतकरी संकटात सापडला आहे. नदी-नाले, विहीरी कोरड्या झाल्याने शेती व पिण्याच्या पाण्याचे मोठे दुर्भिक्ष्य निर्माण झाले आहे. देवळा तालुका दुष्काळी जाहीर करण्यात यावा अशी मागणी जाणता राजा मित्र मंडळाने तहसिलदार दत्तात्रय शेजवळ यांची प्रत्यक्ष भेट घेऊन केली. तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, यावर्षी पावसाळा उशीरा सुरु झाला. थोड्याफार प्रमाणात झालेल्या पावसाच्या पाण्यावर शेतकऱ्यांनी पेरणी केली. पेरणीनंतर तब्बल दीड महीना पावसाने दडी मारल्याने खरीपातील मका, बाजरी, मुग, भुईमूग पीके करपली आहेत. मध्यंतरी पावसाने हजेरी लावल्याने पीके कशीतरी तग धरु लागली. संपूर्ण देवळा तालुक्यात पाऊस बेपत्ता झाल्याने खरीप हंगाम वाया जाणार असल्याचे चित्र दिसत आहे. त्यामुळे तालुक्यातील बळीराजा धास्तावला आहे. जोरदार पावसा अभावी विहिरींना पाणी नाही. गेल्या पाच वर्षापासून सततच्या अवर्षणग्रस्त परीस्थिती मुळे शेतकरी कर्जबाजारी झाला आहे. तालुक्यातील पूर्व भागातील उमराणे परीसरातील आठ गावांची स्थिती वाळवंटा सारखी झाली आहे. खरीप हातचा गेला व रब्बी हंगामाची शास्वती न उरल्याने शेतकरी संकटात सापडला आहे. शासनाने देवळा तालुका तात्काळ दुष्काळग्रस्त जाहीर करावा अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. यावेळी मंडळाचे अध्यक्ष नंदन देवरे, हेमंत देवरे, उमेश देवरे, बाळा पवार, गोरख देवरे, सुनिल देवरे, पंकज देवरे, दत्तु देवरे , योगेश देवरे, यशवंत देवरे, आबा देवरे आदीसह बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.
देवळा तालुका दुष्काळी जाहीर करण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2018 6:53 PM