--------------------------------
कुंदेवाडी येथे लाभार्थ्यांना खावटी अनुदान
सिन्नर : आदिवासी विकास विभागाच्या नाशिक प्रकल्पामार्फत खावटी अनुदान योजनेंतर्गत तालुक्यातील कुंदेवाडी गावातील १११ लाभार्थ्यांना प्रत्येकी दोन हजार रुपयांची रक्कम बॅंक खात्यावर वर्ग करण्यात आली. याशिवाय २ हजार रुपये किमतीच्या जीवनावश्यक वस्तूंचा समावेश असलेल्या किराणा कीटचे ११० लाभार्थ्यांना वाटप करण्यात आले. १ लाभार्थी मृत व गावातील १२ लाभार्थ्यांची बॅँक खात्याची अडचण असल्यामुळे त्यांना पुन्हा सर्व कागदपत्रांची पूर्तता करण्याच्या सूचना आदिवासी विभागाचे अधीक्षक व्ही. टी. हिंगडे यांनी दिल्या.
-------------------------------
कोरोना बाधित आढळल्याने शाळा बंद
सिन्नर : तालुक्यातील भोकणी येथील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये दोन शिक्षकेतर कर्मचारी व एक विद्यार्थी तर निऱ्हाळे माध्यमिक विद्यामंदिरातील एक शिक्षकाची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्याने दोन्ही शाळा बंद करण्यात आल्या आहेत. जिल्हा परिषदेच्या माध्यमिक विभागाच्या शिक्षणाधिकारी वैशाली झणकर यांनी शिक्षकांच्या कोरोना चाचण्या करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यात निऱ्हाळे येथील शिक्षक तर भोकणी येथील दोन शिक्षकेतर कर्मचारी बाधित निघाले. त्यामुळे २८ जुलैपासून या दोन्ही शाळा बंद करण्यात आल्या असून संपर्कात असलेले शिक्षक व विद्यार्थ्यांना होम क्वारंटाईनचा सल्ला देण्यात आला आहे.
-------------------------
महेश थोरात यांना पुरस्कार
सिन्नर : नाशिक येथील भावना बहुउद्देशीय संस्थेतर्फे पंचाळे येथील सामाजिक कार्यकर्ते व ग्रामपंचायत सदस्य महेश थोरात यांना ज्ञानज्योती क्रांतिज्योती पुरस्कार देण्यात आला. आमदार अॅड. राहुल ढिकले यांच्या हस्ते त्यांना सन्मानित करण्यात आले. यावेळी संस्थेचे सचिव महेश मुळे, स्वप्नील येवले, संदीप सिन्नरकर, सुनील दिघे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. या पुरस्काराबद्दल माध्यमिक लोकशिक्षण मंडळाचे सचिव राजेश गडाख यांच्यासह शैक्षणिक, सामाजिक क्षेत्रातून थोरात यांचे स्वागत करण्यात आले.
-------------------------------
देवनदीवरील पुलावरून प्रवास करणे धोकादायक
सिन्नर : सिन्नर-शिर्डी महामार्गाच्या रुंदीकरणाचे काम सुरू असून खोपडी शिवारातील देवनदीच्या पुलावरून प्रवास करताना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत असल्याचे चित्र आहे. शिर्डी महामार्गाच्या रुंदीकरणाच्या कामामुळे पुलाचेही रुंदीकरण सुरू आहे. मात्र, त्यावर अनेक ठिकाणी गतिरोधक उभारण्यासह बाजूला कोणतेही काम सुरू असल्याबाबत फलक लावण्यात आलेले नाहीत. त्यामुळे उर्वरित अरुंद पुलावरून प्रवास करताना वाहनचालकांना जीव मुठीत धरून प्रवास करण्याची वेळ आली आहे.