मालेगाव : महानगर पालिकेचे वादग्रस्त ५ ठराव रद्द करून संबंधित लोकप्रतिनिधींची राज्य गुप्त वार्ता विभागामार्फत चौकशी करावी, अशी मागणी आम्ही मालेगावकर विधायक संघर्ष समितीने अपर जिल्हाधिकारी धनंजय निकम यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
मालेगाव महानगर पालिकेच्या महासभेने घर मोजणी सर्वेक्षण, स्वच्छता आऊटसोर्सिंग, गिरणा धरण पंपिंग स्टेशनमधील ४ पंप दुरुस्ती, जुना आग्रा रोड सिमेंटचा बनवणे, गिरणा धरणाजवळ सोलर प्रोजेक्ट उभारणे हे ठराव मंजूर केले असून, त्यात मोठा भ्रष्टाचार झाल्याचे म्हटले जात आहे.
आयुक्तांवर अविश्वास ठराव मंजूर करण्याच्या महासभेत याच विषयांवर वादळी चर्चा होऊन भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप करण्यात आले तर अविश्वास प्रस्तावाबाबत पत्रकार परिषद घेऊन आयुक्त दीपक कासार यांनी महासभेकडे अंगुली निर्देश करत आरोपांचे खंडन केले.
केंद्र व राज्य सरकारकडून सोलर प्रोजेक्ट उभारणे कमी स्वतंत्र अनुदान योजना राबवली जात असताना, २७ कोटी रुपये खर्च करणे अयोग्य असून, सोलर प्रोजेक्ट उभारण्यासाठी स्वतंत्र प्रस्ताव केंद्र व राज्य शासनाकडे सादर करून हा निधी शहरातील मूलभूत सोयी-सुविधांवर खर्च करणे गरजेचे आहे. या प्रकाराची राज्य गुप्त वार्ता विभागामार्फत चौकशी करण्यात यावी, अशी मागणी निखील पवार, देवा पाटील, राजाराम पाटील, राजेंद्र पाटील, दीपक पाटील, प्रभाकर वाणी, अनिल पाटील, अजीम शेख, रिजवान शेख, आप्पा महाले आदींनी केली आहे.